छोट्या पडद्यावरील अभिनेत्री कविता कौशिकने ९०च्या दशकातील ‘रामायण’ या मालिकेच्या पुनर्प्रक्षेपणावर वादग्रस्त वक्तव्य केले होते. तिच्या य़ा वक्तव्यामुळे सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आले होते. नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री पायल रोहतगीने देखील तिच्यावर निशाणा साधला.

पायलने कवितावर निशाणा साधण्यासाठी ट्विटमध्ये एका मुलाचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमधील मुलाने घरात अन्नधान्याचा साठा असूनही १०० नंबरवर फोन करुन पोलीसांकडे अन्नाची मागणी केली आहे. पोलिस त्या मुलाच्या घरी जातात आणि घराची तपासणी करतात. हा व्हिडीओ शेअर करत पायलने ‘छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या एका अभिनेत्रीकडे काही काम नाही आणि त्यामुळे ती वैतागली आहे. ती अभिनेत्री “F.I.R” या मालिकेमध्ये काम करते. तिचे नाव तुला माहित आहे का? तिच्या कडून अभिनयाचे धडे घे. पण या पुढे १०० नंबरवर फोन करु नकोस’ असे म्हटले होते. पायलचे हे ट्विट वाचून कविताने पायला चांगलेच सुनावले आहे.

 

तिने पायलच्या ट्विटला लगेच प्रत्युत्तर दिले आहे. ‘पायल तु माझं नाव घेऊन बोल. मी माझी एवढी चांगली ओळख निर्माण केली आहे की माझं नाव न घेता लोकं मला ओळखतात. पण तुझं काय? तु एक चांगली अभिनेत्रीही नाहीस आणि माणूसही नाहीस’ असे म्हणत कविताने पायला चांगलेच सुनावले आहे.

आणखी वाचा : ‘तुम्ही संसदेत पॉर्न पाहता आणि आम्हाला रामायण…’ अभिनेत्रीचे वादग्रस्त वक्तव्य

काय म्हणाली होती कविता?
ऐंशीच्या दशकातील दूरदर्शन वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका ‘रामायण’ सरकारने पुन्हा दाखवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कविताने ‘तुम्ही संसदेत बसून मोबाइलवर पॉर्न पाहता आणि आम्हाला रामायण पाहण्यास सांगता’ असे ट्विट केले होते. या ट्विटमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.