सध्या टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय आणि चर्चेत असणारा शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती.’ सोनी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या केबीसी पर्व १२च्या सूत्रसंचालनाची धूरा बिग बींच्या खांद्यावर सोपावण्यात आली आहे. माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या शोमध्ये बुधवारी हॉट सीटवर स्वप्निल चव्हाण हे स्पर्धक बसले होते. पण त्यांनी ५० लाख रुपयांच्या प्रश्नाला गेम सोडला. ५० लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहिती आहे का?

केबीसी १२मध्ये स्वप्निल बुद्धीमत्तेच्या जोरावर चांगले खेळत होते. त्यांनी शोमध्ये २५ लाख रुपये जिंकले होते. त्यांच्या सगळ्या लाइफलाइन देखील संपल्या होत्या. त्यांनी ५० लाख रुपयांच्या प्रश्नाला गेम सोडला. त्यावेळी त्यांना विचारण्यात आलेला प्रश्न “इंडियन मर्चंट चेंबरचे भावी प्रमुख कोण होते, ज्यांची १९०१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती?” हा होता. या प्रश्नाला त्यांना A. फिरोजशाह मेहता, B. दिनशॉ वाच्छा, C. बदरुद्दीन तैयबजी D. दादाभाई नौरोजी हे पर्याय देण्यात आले होते.

५० लाख रुपयांच्या या प्रश्नाचे उत्तर स्वप्निल यांना देता आले नाही. त्यानंतर त्यांनी गेम सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी A फिरोजशाह मेहता हा पर्याय निवडला पण त्यांचे हे उत्तर चुकीचे होते. या प्रश्नाचे योग्य उत्तर B. दिनशॉ वाच्छा आहे.

स्वप्निल यांनी १० वर्षे एका कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम केले आहे. २०१५मध्ये त्यांनी स्वत:ची कंपनी सुरु केली. पण करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आता त्यांच्याकडे कोणताही प्रोजेक्ट नाही.