छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि चर्चेतील शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती.’ माहितीचा स्त्रोत म्हणून या शोकडे पाहिले जाते. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या केबीसी १२चे पर्व सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे शोमध्ये हॉटसीटवर बसणारे स्पर्धक नेहमीच चर्चेत असतात. नुकताच रायबरेली येथे राहणाऱ्या फरहत नाज यांनी शोमध्ये हजेरी लावली. त्यांनी २५ लाख रुपये जिंकले. त्यांना ५० लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहिती आहे का?

मंगळवारी २० ऑक्टोबर रोजी फास्टेस्ट फिंगर फर्स्टमध्ये सर्वात कमी वेळात प्रश्नाचे उत्तर देत फरहत या हॉट सीटवर येऊन बसल्या. त्यांनी बुद्धीमत्तेच्या जोरावर २५ लाख रुपये जिंकले. पण ५० लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर माहिती नसल्यामुळे त्यांना खेळ सोडावा लागला.

फरहत यांना ५० लाख रुपयांसाठी १८५७च्या उठावादरम्यान लखनऊचे नेतृत्व करणाऱ्या बेगम हजरत महल यांचे खरे नाव काय होते? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यासाठी A. बीबी मुबारिका, B. मेहर-इन-निसा, C. सिकंदर जहान आणि D. मोहम्मदी खानम हे पर्याय देण्यात आले होते. या प्रश्नावर बराच वेळ विचार करुन फरहत यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी खेळ सोडताना ‘बीबी मुबारिका’ असे या प्रश्नाचे उत्तर वाटत असल्याचे सांगितले होते. पण खात्री नसल्यामुळे त्यांनी गेम क्विट करण्याचा निर्णय घेतला.

या प्रश्नाचे योग्य उत्तर D. मोहम्मदी खानम हे आहे. हे उत्तर ऐकल्यानंतर फरहत यांना गेम क्विट केल्याचा आनंद झाला होता.