स्टारकिडचं बॉलिवूड पदार्पण म्हटलं की त्या चित्रपटाकडे अनेकांचं लक्ष असतं. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर हिच्या पदार्पणानंतर सैफ अली खानची मुलगी सारा अली खानच्या चित्रपटाची उत्सुकता होती. बऱ्याच अडचणींनंतर साराचा ‘केदारनाथ’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. जान्हवी आणि साराची तुलना सुरुवातीपासूनच झाली. त्यामुळे साराचा चित्रपट बॉक्स ऑफीसवर काय कमाल करतो याकडे सर्वांचं लक्ष होतं. प्रेक्षक-समीक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रियेनंतर पहिल्या दिवशी ‘केदारनाथ’ने ७.२५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. हा आकडा जान्हवीच्या ‘धडक’ चित्रपटापेक्षा कमीच होता. दुसऱ्या दिवशी मात्र कमाईने थोडा जोर धरला. शनिवारी या चित्रपटाची कमाई ९.७५ कोटी रुपये इतकी झाली. त्यामुळे दोन दिवसांत सारा आणि सुशांत सिंह राजपूतच्या ‘केदारनाथ’ चित्रपटाने जवळपास १७ कोटींची कमाई केली. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ही माहिती दिली.

२०१३ मध्ये उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयाचा संदर्भ ‘केदारनाथ’ या चित्रपटाला देण्यात आला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक कपूरने केलं आहे. या चित्रपटावर काही धार्मिक संघटनांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे उत्तराखंड राज्यातील काही जिल्ह्यात या चित्रपटाच्या प्रदर्शनावर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे याचाही परिणाम चित्रपटाच्या कमाईवर झाला आहे.

वाचा : ..म्हणून अनिल कपूर यांनी नाकारला श्रीदेवींचा ‘चालबाज’ चित्रपट

‘केदारनाथ’ची स्पर्धा रजनीकांत यांच्या ‘2.0’ या चित्रपटाशी आहे. भारतातील सर्वांत महागडा चित्रपट ‘2.0’ला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांनी गर्दी केली होती. या चित्रपटाच्या हिंदी डब व्हर्जनने १५० कोटींचा आकडा पार केला आहे.