‘पेस्तनजी’ या चित्रपटातून १९८८ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री किरण खेर यांचा आज वाढदिवस. किरण खेर यांनी आपल्या दमदार अभिनयामुळे कलाविश्वात स्वत:च स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. केवळ अभिनय हा ध्यास समजणा-या किरण यांनी पंजाबमधून अभिनयाला सुरुवात केली होती. एका लहानशा ठिकाणाहून अभिनयाची सुरुवात करणा-या किरण यांचा एक दिवस बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये समावेश होईल असे त्यांनाही वाटलं नव्हतं. मात्र प्रचंड मेहनत आणि कामाप्रतीचे प्रेम यामुळे त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आणि आपले स्थान अढळ केले. विशेष म्हणजे प्रेक्षकांची मन जिंकण्यासोबतच त्यांनी कलाविश्वातील आणखी एका व्यक्तीच्या मनावर राज्य केलं. ती व्यक्ती म्हणजे अभिनेता अनुपम खेर. किरण खेर आणि अनुपम खेर यांनी प्रेमविवाह केला असून त्यांची लव्हस्टोरी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात.

किरण खेर आणि अनुपम खेर हे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना एकमेकांना ओळखत होते. मात्र त्यांच्यामध्ये केवळ मैत्रीचं नातं होतं. प्रेम किंवा लग्न हा विचारदेखील त्यांना स्पर्शून गेला नव्हता. त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा त्यांची मुंबईमध्ये भेट झाली. मात्र, यावेळी दोघांचंही लग्न झालं होतं. त्याकाळामध्ये अनुपम खेर आणि किरण खेर दोघेही काम करण्यासाठी स्ट्रगल करत होती. यादरम्यान दोघांमधील मैत्री वाढत गेली आणि त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. स्ट्रगल काळातच अनुपम खेर यांना १९८५ साली ‘सारांश’ हा पहिला चित्रपट मिळाला. या चित्रपटानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. विशेष म्हणजे त्यांनी या चित्रपटानंतर आपल्या पत्नीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतला. याचदरम्यान किरण खेर यादेखील त्यांच्या पतीपासून गौतम बेरी यांच्यापासून विभक्त झाल्या होत्या.

घटस्फोटानंतरही किरण आणि अनुपम हे आपल्या करिअरकडे लक्ष केंद्रित करुन होते. त्याचवेळी त्यांची पुन्हा एकदा कोलकातामध्ये नादिरा बब्बर यांच्या एका कार्यक्रमामध्ये झाली. त्यानंतर या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या कार्यक्रमादरम्यान अनुपम यांनी किरण यांना लग्नाची मागणी घातली. ते इतक्यावरच न थांबता त्यांनी किरण यांच्या मुलाला सिकंदरला देखील स्वत:च नाव दिलं.

दरम्यान, किरण यांनी ‘देवदास’, ‘हम तुम’, ‘वीर-झारा’, ‘फना’, ‘रंग दे बसंती’, ‘कभी अलविदा ना कहना’, ‘ओम शांती ओम’ असे अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. अभिनयाव्यतिरिक्त त्यांनी राजकारणातही आपले नशीब आजमावल्याचे पाहायला मिळते. किरण यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत.