सध्या करोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच बॉलिवूड अभिनेते किरण कुमार यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले होते. करोना चाचणी रिपोर्ट समोर येताच त्यांनी स्वत:ला घरातच क्वारंटाइन करु घेतले आहे. ते फोनद्वारे घरातल्यांशी संपर्क साधत आहेत. पण किरण यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतरही ते क्वारंटाइन केंद्रात का गेले नाहीत? असा प्रश्न अनेकांना पडला होता. नुकताच त्यांनी या मागचे कारण सांगितले आहे.

७४ वर्षीय किरण कुमार यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह येताच क्वारंटाइन केंद्रामध्ये जाण्याऐवजी त्यांनी घरातच स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे. या संदर्भात नुकताच त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी ‘मी काही दिवसांपूर्वी माझा नेहमीचा चेकअप करुन घेतला होता. त्यावेळी माझ्या अनेक चाचण्या झाल्या. त्यात करोना चाचणीचा देखील समावेश होता. त्यानंतर माझे सगळे रिपोर्ट आले. १४ मे रोजी माझी करोना चाचणी पॉझिटीव्ह आली’ असे म्हटले.

‘मला करोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नव्हती. मला सर्दी झाली नाही, खोकला नव्हता किंवा ताप-डोके दुखी देखील जाणवत नव्हती. जर मला कोणताही त्रास होत नाही तर रुग्णालयात अॅडमिट व्हावे असे मला वाटत नाही. माझे घर दोन मजल्यांचे आहे. मी स्वत:ला घराच्या पहिल्या मजल्यावर क्वारंटाइन करुन घेतले आहे. तसेच मी कुटुंबीयांच्या संपर्कात नाही’ असे त्यांनी पुढे म्हटले.

किरण कुमार हे बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेते आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना करोना झाल्याचे समोर आले होते. सर्वात पहिले बॉलिवूड गायिका कनिका कपूरला करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर चित्रपट निर्माते करिम मोरामी आणि त्यांच्या दोन्ही मुली जोया आणि शाजिया यांना करोना झाला होता.