दादा कोंडके हे विनोदाचे बादशहा म्‍हणून ओळखले जातात. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक सरस चित्रपट दिले. ‘विच्छा माझी पुरी करा’ या वगनाटय़ापासून सुरू झालेला ‘त्यांचा’ प्रवास चित्रपटसृष्टीकडे वळला आणि सलग नऊ रौप्यमहोत्सवी चित्रपट देऊन अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि इतरही भूमिकांमध्ये वावरलेल्या दादा कोंडके यांनी आगळा विक्रम घडविला. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अभिजीत बिचुकले व किशोरी शहाणे यांनी दादा कोंडकेंची आठवण काढली.

गप्पा मारताना बिचुकले व किशोरी यांच्यात दादा कोंडकेंचा विषय निघाला. “दादा कोंडके हे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व होतं. स्वत:च कथा लिहिणार, स्वत:च दिग्दर्शन करणार. अवघ्या महाराष्ट्राला त्यांनी भरभरून हसवलं. दादा कोंडके तुम्हाला येथून बिग बॉसच्या घरातून नमस्कार,” असं बिचुकले म्हणाला. हे ऐकून किशोरीताईसुद्धा जुन्या आठवणींमध्ये रमतात.

“दादा कोंडके यांचा पुतण्या विजय कोंडकेंनी माहेरची साडी चित्रपटासाठी काम केलं. माझ्या वाढदिवशी चित्रपटाची शूटिंग सुरू असताना दादा खास सेटवर आले आणि सेलिब्रेशन केलं. मला त्यांनी भेट म्हणून घड्याळ दिलं. ते घड्याळ मी अजूनही वापरते. ही गोष्ट १९९१ ची आहे. दादांनी दिलेलं घड्याळ अजूनही चालूच आहे,” असं त्यांनी सांगितलं.