भारतातील कोणत्याही परीक्षेच्या तुलनेत आयआयटीची परीक्षा सर्वाधिक कठीण असते, असे मानले जाते. पण तरीही, देशभरातील लाखो विद्यार्थी अथक मेहनत करत परीक्षेची तयारी करुन आपले हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करत असतात. द व्हायरल फीवर (टीव्हीएफ)ने अनअॅकॅडमीच्या सहयोगाने ‘कोटा फॅक्टरी’ ही नवी समकालीन ड्रामा सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. ही कथा आयआयटीची तयारी करणारे विद्यार्थी, कोचिंग सेंटर इंडस्ट्री आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यात घडणारे बदल याभोवती फिरते. सादरीकरणात एक नवा प्रयोग करत ही सीरिज ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’मध्ये दाखवली जाणार आहे.

कोटा फॅक्टरी ही वैभव (मयूर मोरे) या १६ वर्षांच्या मुलाची कथा आहे. जेईई पास करून आयआयटीमध्ये जाण्याचे स्वप्न घेऊन वैभव कोटाला आला आहे. मंगळवारी १६ एप्रिल २०१९ रोजी प्रदर्शित होणाऱ्या कोटा फॅक्टरीमध्ये जितेंद्र कुमार (जीतू), अहसान चन्ना (शिवानी), रेवती पिल्लई (वर्तिका), आलम खान (उदय) आणि रंजन राज (मीना) यांच्याही भूमिका आहेत.

प्राध्यापकांची भूमिका साकारणारे जितेंद्र कुमार म्हणाले, “कोटा फॅक्टरीसोबत अनेक भावना जोडल्या गेल्या आहेत. हा माझ्यासाठी फारच छान अनुभव होता. कोटामध्ये राहत असताना मी बऱ्याचदा माझ्या शिक्षकांच्या नकला करायचो आणि आम्ही सगळेच त्यावर खूप हसायचो. खरं तर तिथूनच माझ्या अभिनयाच्या कारकिर्दीलाही सुरुवात झाली. आता इतक्या वर्षांनंतर कोटातील शिक्षकाची भूमिका साकारताना त्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. प्रवेश परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आपापसातील वागणे आणि त्यांचे तिथले आयुष्य चोख दर्शवणारा कोटा फॅक्टरी हा अगदी अनोखा शो आहे.”

नायकाच्या भूमिकेतील मयुर मोरे म्हणाला, “कोटा फॅक्टरी माझ्या म्हणजे वैभवच्या नजरेतून घडताना दिसते. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील या टप्प्यातील चढउतार यात आहेत. याप्रकारच्या शोचा भाग असणे ही माझ्यासाठी फार मोठी संधी आहे आणि हा शो बनवण्यासाठी आम्ही घेतलेल्या मेहनतीचे प्रेक्षक कौतुक करतील, अशी आशा आहे.”

कोटा फॅक्टरी या टीव्हीएफ ओरिजनल सीरिजचे दिग्दर्शन राघव सुब्बू यांनी केले आहे. आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाच्या आणि कठीण परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या आयआयटी इच्छुकांच्या दैनंदिन जीवनातील ताणतणाव, चढउतार, प्रयोग यात दाखवण्यात आले आहेत. वेगवेगळ्या कोचिंग सेंटरच्या प्राध्यापकांना भेटणे, चीटिंग करणे, चुकीच्या गोष्टी करण्याची उबळ, सोपे मार्ग शोधणे… आयआयटी इच्छुकांच्या आयुष्यातील अगदी ए-टू-झेड गोष्टींचा समावेश कोटा फॅक्टरीमध्ये आहे.

‘कोटा फॅक्टरी’ हा नवा ड्रामा टीव्हीएफप्ले आणि यूट्यूबवर १६ एप्रिलपासून प्रदर्शित होणार आहे.