बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो केवळ ३४ वर्षांचा होता. सुशांतने बॉलिवूडमधील घराणेशाहीला वैतागून आत्महत्या केली असे काही कलाकारांचे मत आहे. दरम्यान अभिनेता कमाल खानने घराणेशाहीवर निशाणा साधत बॉलिवूडमधील मोठ्या कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. या कंपन्या कुठल्याही कलाकाराचे करिअर संपवू शकतात असा दावा त्याने केला आहे.

कमाल खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त व्यक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. यावेळी त्याने थेट बॉलिवूडमधील नामांकित चित्रपट निर्मिती कंपन्यांशी पंगा घेतला आहे. “धर्मा (करण जौहर), यश राज फिल्म्स (आदित्य चोप्रा), टी सीरिज (भूषण), बालाजी (एकता कपूर), नाडियाडवाला (साजित) आणि सलमान खान फिल्म्स या सहा कंपन्या बॉलिवूडवर नियंत्रण ठेवतात. या कंपन्या कुठल्याही कलाकाराचे करिअर एका झटक्यात संपवू शकतील इतकी ताकत यांच्याकडे आहे.” अशा आशयाचे ट्विट केआरकेने केले आहे. कमाल खानचे हे ट्विट सध्या चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या ट्विटमुळे काही जणांनी कमालवर टीका केली आहे तर काही जणांनी या ट्विटशी सहमत असल्याचेही म्हटले आहे.