सध्या महाराष्ट्राचे राजकारण हे एका वेगळ्या वळणावर असल्याचे दिसत आहे. शनिवारी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र मंगळवारी अजित पवार यांनी आधी उपमुख्यमंत्रिपदाचा व त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. सध्या राज्यात सुरु असलेल्या या घडामोडींवर बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान (KRK)ने त्याची प्रतिक्रिया देत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

कमाल खानने ट्विटरद्वारे त्याचे मत व्यक्त करत ‘आज अजित पवार धोबी के पप्पू बन गए है, ना घर के रहे ना घाट के’ असे म्हटले आहे. त्याचे हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.

या ट्विट पाठोपाठ कमालने आणखी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. केआरकेचे हे दोन्ही ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

महाराष्ट्रात स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सकाळी महत्वपूर्ण निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, त्याचे लाइव्ह प्रक्षेपण करा, असे दिशानिर्देशही कोर्टाने दिले आहेत. उद्या, (बुधवारी) संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्यात यावी आणि हंगामी विधानसभा अध्यक्षांची निवडही केली जावी, असे आदेशही न्यायालयाने दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी बहुमत नसल्याचे सांगत राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच अजित पवार यांनी वैयक्तिक कारण देत उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे अशी माहितीही फडणवीस यांनी दिली आहे.