‘द कपिल शर्मा शो’मध्ये गोविंदा व त्याची पत्नी सुनिता यांची हजेरी आणि त्याच वेळी गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेक याची एपिसोडमध्ये अनुपस्थिती यांमुळे गेल्या काही दिवसांपासून मामा-भाच्याचा वाद चांगलाच चर्चेत आला आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सपना ही भूमिका साकारणारा कृष्णा हा गोविंदाचा भाचा आहे. नेमकं ज्यादिवशी गोविंदाने कार्यक्रमात हजेरी लावली त्याचदिवशी कृष्णा अनुपस्थित राहिला. गोविंदा कार्यक्रमात एण्ट्री करण्यापूर्वी कृष्णाने कॉमेडी केली, मात्र त्यानंतर तो गायब झाला. यामुळे मामा-भाच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला. या वादावर कृष्णाने मौन सोडलं असून त्याने गोविंदाच्या पत्नीबाबत गौप्यस्फोट केला आहे.

”गोविंदा कार्यक्रमात आल्यावर कृष्णाने त्यात सहभागी होऊ नये असं सुनिता मामीने आधीच सांगून ठेवलं होतं. त्यामुळे त्यांच्या येण्याआधी मी कार्यक्रमात होतो. मात्र त्यानंतर मला त्यातून बाहेर पडावं लागलं. सुनिता मामीने असं का सांगितलं याचा विचार मीसुद्धा करतोय. कारण माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे”, असं कृष्णा ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला. याविषयी तो पुढे म्हणाला, ”मी यावरून वाद नाही केला कारण माझी बहीण नर्मदासाठी तो खूप मोठा दिवस होता. तिच्या अल्बमच्या प्रमोशनसाठी ते तिथे आले होते. एक मोठा भाऊ या नात्याने मी जर माझ्या छोट्या बहिणीसाठी एवढं करू शकतो, तर त्यांनीसुद्धा या गोष्टीची दखल घेतली पाहिजे.”

पाहा फोटो: ‘बजरंगी भाईजान’मधील मुन्नी आता अशी दिसते

मामा गोविंदासोबत सहा महिन्यांपूर्वीच वाद मिटला होता असंही त्याने सांगितलं. ”चिची मामा आणि मी सहा महिन्यांपूर्वीच बोलू लागलो होतो. त्यांच्या घरीसुद्धा मी काही वेळा गेलो होतो. इतकंच नव्हे तर २० दिवसांपूर्वी मी जेव्हा दुबईत त्यांना भेटलो तेव्हा ते स्वत: म्हणाले की मामीसोबतचंही भांडण मिटवण्याचा प्रयत्न कर. पण मामी अजूनही नाराज आहे”, असं त्याने भांडणाबाबत सांगितलं.

कृष्णाची पत्नी कश्मीराने केलेल्या एका ट्विटवरून या दोन कुटुंबामध्ये वाद सुरू झाला होता. ‘लोकं पैशांसाठी नाचतात’, असं ट्विट तिने केलं होतं आणि तेव्हापासूनच मामा-भाचामध्ये कटुता निर्माण झाली होती.