विनोदाचा बादशहा कपिल शर्मा छोट्या पडद्यावर पुन्हा दिसणार ही त्याच्या चाहत्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बाब आहे. एकेकाळी आपल्या अफलातून विनोदबुद्धीच्या जोरावर कपिल शर्मानं फक्त देशातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. पण सहकलाकारांसोबत झालेले वाद, कपिलनं त्यांना दिलेली अपमानास्पद वागणूक यातून कपिलच्या प्रसिद्धीला उतरती कळा लागली. छोट्या पडद्यावरचा कपिलचा गाजलेला  शोदेखली बंद करण्याची वेळ चॅनेलवर आली. पण, आता कपिलसोबत नवा शो सुरु करण्याची तयारी सोनीनं केली आहे. याचा प्रोमोदेखील आला आहे. प्रोमो दमदार असला तरी यात कपिलचे जुने सहकलाकार मात्र दिसले नाही. आता कपिलचे जुने सहकलाकार या शोमध्ये दिसतील न दिसतील पण कपिलसोबत नव्या शोमध्ये काम करण्याची इच्छा मात्र विनोदवीर कृष्णा अभिषेकनं बोलून दाखवली आहे. कृष्णा आणि कपिलचं नातं कट्टर प्रतिस्पर्धींचं आहे.

‘मला कपिल शर्मासोबत त्याच्या नव्या शोमध्ये काम करण्याची इच्छा आहे. त्यानं फोन केला तर मी एका पायावर त्याच्यासोबत काम करायला तयार होईल. पण, तो मला कधीच त्याच्यासोबत काम करण्यासाठी विचारणार नाही याची मला खात्री आहे’ असं कृष्णा ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला. कपिल आणि मी प्रतिस्पर्धी असलो तरी आमच्यात मैत्रिचं नातं देखील आहे. त्यामुळे कपिलसोबत मला काम करायला आवडेल असं कृष्णा म्हणाला. आता कपिलच्या नव्या शोमध्ये त्याच्यासोबत काम कोण करणार हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. पण कपिल त्याच्या नव्या शोमध्ये कृष्णाला स्थान देणार का हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरणार आहे. कपिलनं गेल्याच आठवड्यात लाइव्ह चॅटमध्ये आपल्या शोचं नाव ‘फॅमिली विथ कपिल शर्मा’ असल्याचं म्हटलं होतं. तसेच पूर्वीच्या दोन शोपेक्षा हा शो वेगळा असणार असंही कपिल म्हणला होता. त्यामुळे कपिलचा हा शो पुन्हा टीआरपीच्या लिस्टमध्ये वरचढ ठरणार का हेदेखील पाहणं महत्त्वाचं ठरेल.