कॉमेडियन कुणाल कामरा आपल्या ट्विट्समुळे आणि वेगवेगळ्या व्हिडिओंमधून करत असलेल्या उपहासात्मक टीकेमुळे प्रसिद्ध आहे. त्याने आता नवीन ट्विट केलं आहे. आज पाच राज्यांमध्ये मतमोजणी सुरु आहे. त्या संदर्भातलं हे ट्विट आहे.

आपल्या ट्विटमध्ये तो म्हणतो, “तुम्ही कितीही निवडणुकांचं विश्लेषण करा, येणार तर ईव्हीएमच!” त्याच्या या ट्विटला अनेक जणांनी रिट्विट केलं आहे. तर अनेकांनी त्याला या ट्विटवरुन ट्रोलही केलं आहे.

एक युजर म्हणतो, जर ममता जिंकल्या तर तू हे ट्विट डिलीट करशील काय़? तर दुसरा युजर म्हणतोय, ही परिस्थिती आपण सर्वांनी मिळून आणली आहे. दारु पाहून सरपंच, पैसे पाहून आमदार, जात पाहून मुख्यमंत्री आणि धर्म पाहून पंतप्रंधान तर आपणच निवडलेत.

आणखी वाचा- Assembly Election Results 2021: ‘EVM वर बंदी घाला लोकशाही वाचवा’; ३५ हजारांहून अधिक पोस्ट

पूर्वेकडे पश्चिम बंगाल, ईशान्येकडे आसाम, दक्षिणेत तमिळनाडू, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश पुडुचेरी या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली आहे. मात्र त्याआधीच सोशल नेटवर्किंगवर ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रीक व्होटींग मशिन्सविरोधात आवाज उठवला जात आहे. या निवडणुकीच्या प्राथमिक मतमोजणीचे कल हाती येण्याआधीपासूनच ईव्हीएमचा वापर करुन निवडणुका घेणं बंद केलं पाहिजे असं म्हणणारा, #BanEVM_SaveDemocracy हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे.

शनिवार सायंकाळपासूनच #BanEVM_SaveDemocracy हा हॅशटॅग वापरुन ट्विट करण्यात येत आहेत. मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच आज सकाळी आठवाजेपर्यंत या हॅशटॅगवर जवळजवळ ३५ हजारांहून अधिक ट्विट करण्यात आलेत.