अभिनेता कुणाल कपूरची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘कौन कितने पानी में है’ येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन निला मधाब पांडा यांनी केले आहे.
जमीनदार व सर्वसामान्य जनता यांच्यातील संघर्ष या चित्रपटात दाखवला आहे. गावात दुष्काळ पडला असता जमीनदारांना पाण्याची कमतरता भासते. तर, सामान्य जनतेने पाण्याचे नियोजन केलेले असल्याने ते निर्धास्त असतात. ज्यावेळी पांडा या कथेचे वाचन करत होते त्यावेळी ही कथा काल्पनिक असल्याचे कुणालला वाटले होते. परंतु, पांडा यांनी ही घटना सत्यपरिस्थितीवर आधारित असून, त्यांच्या लहानपणी घडल्याचे सांगितले.
कुणालने आत्तापर्यंत वेलकम टू  सज्जनपूर (२००८), डॉन(२०११) व लव शव दे चिकन खुराणा (२०१२) या चित्रपटांमधून अभिनय केला आहे. तसेच त्यानी गेल्यावर्षी अबुधाबी येथे रेसिंग ट्रॅकवर फॉर्म्युला थ्रीचे ट्रेनिंग  घेतले आहे.
यावेळी मनोगत व्यक्त करताना कुणालने सांगितले की, चित्रपटात काम करणं ही काही सोपी गोष्ट नाही, पण मी स्वतःला भाग्यवान समजतो. कारण मला आमीर, शाहरूख आणि माधुरी दीक्षित सारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. ज्यावेळी चांगल्या कथा येत नाहीत त्यावेळी मी चांगल्या कथानकाची संयमाने वाट पाहतो व चित्रपटाची कथा आवडल्यावरच होकार कळवतो. वर्षाला चार ते पाच चित्रपट माझ्याकडे येत असून, मी ते नाकारतो. कारण त्याची कथा मला आवडत नाही. चित्रपटात अभिनय करण्याव्यतिरिक्त कुणाल लिहितोदेखील. वयाच्या १४ व्या वर्षापासून तो लेखनात रमत असल्याचे कुणालने सांगितले. तसेच त्याच्याकडे अनेक कथांच्या संकल्पना लिहिलेल्या असून, त्यांच्यावर चित्रपट काढण्यास कुणाल ऊत्सुक आहे. त्याचप्रमाणे कुणाल विभाजनाची कथा असलेल्या एका नाटकात काम करतो आहे. हे नाटक नोव्हेंबरमध्ये मुंबईत प्रदर्शित होणार आहे.