सध्या बॉलीवूडकरांना लग्नाचे वेध लागले आहेत. ‘मिनाक्षीः अ टेल ऑफ थ्री सिटीज’ या चित्रपटाने २००५ साली बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता कुणाल कपूर हादेखील लग्नबंधनात अडकणार आहे. ‘रंग दे बसंती’ या यशस्वी चित्रपटातील सहकलाकार असलेला कुणाल हा बच्चन कुटुंबाचा जावई होणार आहे.
बॉलिवूड स्टार कुणाल कपूरचा अलीकडेच अमिताभ बच्चन यांचे भाऊ अजिताभ बच्चन यांच्या मुलीसोबत साखपुडा झाला आहे. अजिताभ आणि रमोला बच्चन यांची मुलगी नैना बच्चन अमिताभ बच्चन यांची पुतणी आहे. कुणाल आणि नैनाचे मागील दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते आणि अलीकडेच एका खासगी समारंभामध्ये त्यांचा साखरपुडा झाल्याची बातमी सूत्रांनी दिली आहे. नैना ही इन्व्हेस्टमेण्ट बँकर आहे. कुणालसोबत अधिकाधिक वेळ घालवता यावा यासाठी ती नुकतीच नवी दिल्लीतून मुंबईत राहण्यास आली आहे.