सध्या ‘लग्न’ या विषयावरच्या नाटकांचं प्रचंडच पीक आलंय. निर्मात्यांना हा विषय धंद्याच्या दृष्टीनं बहुधा ‘सुरक्षित’ वाटत असावा. या विषयाला प्रेक्षकांकडून ‘किमान हमी भाव’ मिळण्याची शाश्वती असल्यानंच या rv09नाटकांचं पेव फुटलेलं दिसतंय. लग्नाळू, नुकतंच लग्न झालेले, लग्नानं सुखावलेले, दुखावलेले, लग्नानं पोळलेले, लग्नानं कृतार्थ झालेले अशा समग्र स्त्री-पुरुषांचा या नाटकांना प्रतिसाद मिळण्याची खात्री असल्यानं आणि वैवाहिक जीवन हा मध्यमवर्गीय प्रेक्षकांचा चिरंतन जिव्हाळ्याचा विषय असल्यानं अशी नाटकं मोठय़ा संख्येनं येत असावीत. आता त्यांत एक नवी भर पडली आहे ती ‘सुयोग’ निर्मित आणि अद्वैत दादरकर लिखित-दिग्दर्शित ‘लगीनघाई’ या नाटकाची! या नाटकाचा विषय काही नवा नाहीए. यापूर्वीही या विषयावर अनेक नाटकं येऊन गेली आहेत. आपला मुलगा लग्नाच्या वयाचा झालेला असताना विधुरानं (विधवा स्त्रीच्या बाबतीत तर हा प्रश्न फारच गहन असतो.) पुन्हा बोहोल्यावर चढावं का, हा या नाटकाचा विषय! सर्वसाधारणत: याकडे मध्यमवर्गीय पारंपरिक मानसिकतेतून भुवया उंचावूनच पाहिलं जातं. ‘त्या’ व्यक्तीच्या शारीरिक/ भावनिक/ मानसिक गरजांचा विचार कुणीच करत नाही. तिच्याकडे गुन्हेगार म्हणूनच पाहिलं जातं. या सामाजिक तसंच कौटुंबिक दबावामुळेच आपल्याकडे पुनर्विवाह सहजगत्या होत नाहीत. आणि झाले तरी ते सहज स्वीकारले जात नाहीत. घरचे, बाहेरचे अशा सगळ्यांचंच दडपण पुनर्विवाह करू इच्छिणाऱ्या व्यक्तीवर असतं. एवढय़ा सर्वाचा रोष व तिरस्कार पत्करून पुनर्विवाह करणं ही सोपी गोष्ट नाही. विशेषत: पुनर्विवाहामुळे आपल्या मुलांच्या नजरेतून आपण उतरू, ही भीती तर त्या व्यक्तीच्या मनाला सतत कुरतडत असतेच. मुलांच्या दृष्टिकोनातून पाहू जाता, आपल्या आई वा वडिलांनी आपल्या दिवंगत वडील/ आईच्या स्मृतींशी प्रतारणा करून नव्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात स्थान देणं, हे त्यांनाही पचायला जड जातं. त्यामुळे पुनर्विवाहात सामाजिक कंगोऱ्यांबरोबरच संबंधितांच्या भावनिक व मानसिकतेचा मुद्दाही तितकाच गुंतलेला असतो. म्हणूनच बहुधा आपल्याकडे पुनर्विवाहांचं प्रमाण कमी दिसतं. आता जागतिकीकरणाच्या रेटय़ामुळे आपल्याकडेही व्यक्तिवादानं उसळी घेतल्यानं सर्वानाच ‘आपलं सुख’ अधिक महत्त्वाचं वाटू लागलंय. परिणामी पुनर्लग्नांचं प्रमाणही वाढतंय. न कळत्या वा जाणत्या वयातल्या आपल्या मुलांनी आपलं पुनर्लग्न स्वीकारो वा न स्वीकारो; त्याची तमा मी का बाळगावी, हा दृष्टिकोन आज वाढीस लागला आहे.
या पाश्र्वभूमीवर या नाटकातल्या राजीव या प्रौढ विधुराने मालती प्रधान या घटस्फोटित स्त्रीच्या प्रेमात पडून पुनर्विवाहाचा निर्णय घेणं; परंतु आपला हा निर्णय मुलाच्या मनातली आपली आदर्श प्रतिमा ध्वस्त करील, या भयानं त्यानं आपल्या तरुण मुलाला- अनिकेतला हे सांगायची टाळाटाळ करणं, हे काहीसं मागच्या काळातलं वाटतं. अर्थात आज असं घडत नाही असं नाही. एकाकीपणामुळे आपल्याला सहचरीची गरज भासतेय, हे अनिकेतला सांगणं राजीवना काही केल्या जमत नाही. दरम्यान, शिक्षण व नोकरीनिमित्त दूर असलेला अनिकेत दिवाळीत घरी येईल तेव्हा त्याला ही गोष्ट सांगायचीच असं राजीव ठरवतात. मालती तर गेली तीन वर्षे राजीवच्या मागे लकडा लावून आहे. तिच्या घरचे तिचा संसार पुन्हा उभा राहावा म्हणून अधीर झालेत. त्यांचंही दडपण तिच्यावर आहे. परंतु ‘अनिकेतला आज सांगतो, उद्या सांगतो’ असं करत राजीव ही गोष्ट आजपर्यंत टाळत आले आहेत.  
अशात अनिकेत दिवाळीकरता घरी आल्या आल्याच आपण पूनमच्या प्रेमात पडल्याचं आणि तिच्याशी लग्न करणार असल्याचं जाहीर करतो. त्यामुळे राजीवची पंचाईत होते. आता मुलाचं लग्न करण्याची वेळ आली असताना आपण बोहोल्यावर चढणं बरं दिसणार नाही, हा विचार मनात येऊन ते मालतीला आपल्याला विसरून जायला सांगतात. त्यांच्या या आकस्मिक निर्णयानं मालती अक्षरश: कोलमडूनच पडते. तिच्या स्वप्नांच्या पुन्हा चिंधडय़ा उडालेल्या असतात. राजीवनाही हा निर्णय घेताना क्लेश होत नाहीत असं नाही; परंतु आदर्श बाप म्हणून आपली प्रतिमा जपणं, हे त्यांना आपल्या व मालतीच्या सुखापेक्षा अधिक महत्त्वाचं वाटतं.  
तथापि अनिकेत आणि पूनम यांच्यात तिच्या वडिलांच्या सनातनी, बुरसटलेल्या आचारविचारांपायी जोरदार भांडण होतं आणि रागाच्या भरात अनिकेत पूनमबरोबर आपलं ब्रेकअप झाल्याचं जाहीर करतो. यामुळे राजीवची आपल्या लग्नाबद्दलची आशा पुन्हा एकदा पल्लवित होते. ते मालतीला बोलवून घेतात आणि तसं तिला सांगतात. पण मालती त्यांचं काही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नसते. ती त्यांना स्पष्टपणे बजावते, की त्यांनी आपल्यासमोरच अनिकेतला ही गोष्ट स्वच्छपणे सांगावी. तरीही राजीवना आपल्या लग्नाबद्दल अनिकेतला सांगण्याचं धैर्य होत नाही. अखेरीस मालतीच पुढाकार घेऊन यातून मार्ग काढते. तो कसा, हे नाटकात बघणंच उचित ठरेल!
लेखक अद्वैत दादरकर यांनी प्रौढ व्यक्तींच्या पुनर्विवाहाच्या प्रश्नातला गुंता हलक्याफुलक्या पद्धतीनं या नाटकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वडील आणि मुलगा एकाच वेळी लग्नाच्या बेडीत अडकू इच्छित असले, तरीही आपली मुलाच्या मनातली आदर्श प्रतिमा जपण्याच्या नादात वडिलांची कशी गोची होते, हे ‘लगीनघाई’त दाखवलं आहे. नाटकाचा हा विषय म्हटलं तर बेतलेला, म्हटलं तर वास्तवही आहे. यातले घटना-प्रसंग अपेक्षित वळणांनी फुलत जातात. त्यांत थोडी अनपेक्षितता असली, तरी ती बेतीव आहे. दिग्दर्शक अद्वैत दादरकर यांनी आपणच लिहिलेलं हे नाटय़ सुविहित फुलविण्याचा यत्न केला आहे. कलाकार-निवडीत अशोक सराफ यांची केलेली निवड मात्र चुकीची वाटते. राजीव आणि मालतीच्या वयातल्या अंतराच्या दृष्टीनंही; तसंच या भूमिकेचा सूरही त्यांना सापडलेला नाही. आपल्यावर असलेला विनोदी अभिनेत्याचा शिक्का पूर्णपणे पुसून कोऱ्या पाटीने त्यांनी या भूमिकेत शिरायला हवं होतं. परंतु त्यांना पूर्णाशानं ते जमलेलं नाही. त्यामुळे राजीवची झालेली कोंडी गंभीरपणे सामोरी येण्याऐवजी नको त्या ठिकाणी विनोद होतात. अडचणींच्या प्रश्नांना उत्तरं देताना त्यांनी गांभीर्यानं वासलेला ‘ऑं?’ म्हणून हास्यास्पद वाटतो. दिग्दर्शक म्हणून अद्वैत दादरकर यांच्याकडेही याचं अपश्रेय जातं. राजीव आणि मालती यांच्या वयातलं अंतर बरंच आहे. त्यामुळे ही जोडी स्वीकारायला प्रेक्षकांना काहीसं अवघड जातं. (अर्थात पुनर्विवाहात जोडीदारांच्या वयातल्या मोठय़ा फरकाला कुणाची हरकत असायचं काहीच कारण नाही, हेही खरंय.) नाटक परिचिततेच्या वाटेवरून पुढं पुढं सरकत असल्यानं त्यातल्या गमतीजमती फारशी उत्कंठा निर्माण करत नाहीत. आणखी एक खटकणारी गोष्ट म्हणजे अनिकेत व पूनमनं राजीवच्या पाया पडताना त्यांना मिठीत घेण्याचं राजीवचं हुकणार टायमिंग हे अकारण हशा पिकवण्याचं स्वस्त गिमिक वाटतं. असं करण्याची आवश्यकता नव्हती. उत्तरार्धात मात्र नाटक रूळावर येतं. त्यावेळी मात्र राजीवच्या बोलण्या-वागण्यातली करुण धडपड मनाला स्पर्शून जाते.
शशांक तेरे यांनी राजीवचं सुखवस्तू घर यथास्थित उभं केलेलं आहे. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना नाटकाचा मूड सांभाळते. अभिजीत पेंढारकरांचं संगीत  नाटय़ांतर्गत ताण कमी-अधिक करतं. प्रणोती जोशी यांची वेशभूषा पात्रांचं बाह्य़रूप सूचित करणारी आहे. मालती प्रधानच्या भूमिकेत अदिती देशपांडे चपखल बसल्या आहेत. फक्त सुरुवातीला आपल्या लग्नासंबंधात राजीवनं अनिकेतला सांगावं म्हणून मालतीनं राजीवच्या सतत मागे लागणं काहीसं अति वाटतं. त्यामागची त्यांची निकड कळायला बराच काळ लागतो. परंतु तोवर ही लग्नासाठी अधीर झालेली एक उठवळ बाई आहे असा प्रेक्षकांचा समज होतो. त्यांचा मोलकरणीच्या रूपातला आगाऊपणा आणि लगेचच मालतीच्या मूळ रूपात परतणं, त्यांनी छान दाखवलंय.  मालतीची व्यथावेदना त्यांनी अचूक टिपलीय. ओंकार राऊत यांचा सतत उत्साहानं फसफसलेला अनिकेत लोभस वाटतो. त्याचे तीव्र राग-लोभ आणि उत्तरार्धातला समजूतदारपणा त्यांनी नीटस दाखवलाय. नियती घाटे यांची नवथर, लग्नाळू पूनम मस्तच!