‘माजघरा’तील दोस्तांच्या दुनियेने सध्या घराघरातील प्रेक्षकांवर गारूड घातले आहे. सुजय, अ‍ॅना, आशू, कैवल्य, रेश्मा आणि मीनल या दोस्तांच्या दुनियादारीत नवनवीन चेहरे दाखल होत असतात. थोडा काळ ते त्यांच्यात रमतात आणि मग दोस्तांची आठवण घेऊन बाहेर पडतात. पण, आता या मैत्रीला ‘आदित्य’च्या रूपाने प्रेमाचा स्पर्श होणार आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला आदित्य म्हणजेच अभिनेता ललित प्रभाकर पुढच्या आठवडय़ापासून ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेत एकदम नव्या भूमिकेत दिसणार आहे.
माजघरातील दोस्तांबरोबर मी दिसणार आहे, पण माजघरात मी अजून प्रवेश केलेला नाही, असे ललितने ‘वृत्तांत’शी बोलताना सांगितले. ललित या मालिकेत नाटय़दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. चांगल्या भूमिकांच्या शोधात असलेल्या मीनलची गाठ ऑडिशनच्या निमित्ताने एका नाटकाचा दिग्दर्शक असलेल्या कबीरशी म्हणजेच ललितशी पडते. कबीरलाही आपल्या नाटकासाठी एक चांगली अभिनेत्री हवी असते. तो मीनलला आपल्या नाटकात भूमिका देतो आणि इथून सुरू होते कबीर-ए- दास्ताँ.. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून आदित्य म्हणूनच प्रसिद्ध झालेल्या ललितने मालिका संपल्यानंतर खरे म्हणजे अन्य कोणताही प्रस्ताव स्वीकारला नव्हता. मालिको सुरू होती तेव्हा त्यात इतका अडकून गेलो होतो की घरच्यांबरोबर वेळ घालवणे अवघड होऊन बसले होते. त्यामुळे मालिका संपल्यानंतर पहिल्यांदा घरच्यांना मनासारखा वेळ देता आला, याचा आनंद वाटतो, असे ललितने सांगितले. मालिकेच्या निमित्ताने ज्या लोकांना रोजच भेटण्याची, बोलण्याची सवय झाली होती ते काही लोक दुरावले, याची खंत आहे, पण प्रेक्षक अजूनही आदित्यला विसरलेले नाहीत हे पाहून खूप समाधान मिळते, असे तो म्हणतो.
‘जुळून येती रेशीमगाठी’ संपल्यानंतर लगेचच मालिका करायची नाही, असा निर्णय घेतलेल्या ललितला माजघरातील दोस्तांमुळे आपला निर्णय बदलावा लागला. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही मालिका इतरांप्रमाणेच मीही आवडीने पाहत होतो. या मालिकेची शैली, कथा पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे तो वेगळेपणा तुम्हाला लगेच भावतो. काहीसे नाटकासारखे वेगळ्या पद्धतीने या मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे, ती पद्धतही आवडली आणि संजय जाधव यांचे प्रॉडक्शन आहे त्यामुळे तिथे काम करण्याचा अनुभव पुन्हा वेगळा आहे. त्याचबरोबर कबीर ही जी व्यक्तिरेखा मला मिळाली आहे ती बऱ्याच अंशी माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या जवळपास जाणारी आहे. त्यामुळे ही भूमिका पटकन स्वीकारल्याचे ललितने सांगितले. या मालिकेत ललितचा लुकही दाढी राखलेला, काहीसा वेगळा असणार आहे. सध्या सेटवरही ललितने मीनलबरोबरच चित्रीकरण केले असल्याने अजून प्रत्यक्षातही त्याची माजघरातील अन्य दोस्तांशी भेट झालेली नाही. मात्र, लवकरच ती होईल आणि त्याच्या प्रवेशामुळे दोस्तांच्या दुनियेत उडालेली गडबडही पुढच्या आठवडय़ापासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.