गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. औषधोपचारानंतर आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. ब्रीच कँडी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर फारुख उदवाडिया यांच्या देखरेखीखाली लतादीदींवर उपचार सुरू आहेत.

लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या छातीत दुखू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गायिका असल्याने त्यांच्या फुफ्फुसांची क्षमता चांगली होती, त्यामुळेच यातून लवकर बरं होण्यास मदत झाली. त्यांना काही काळ व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना लवकरच रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी मिळू शकते.

लता मंगेशकर रुग्णालयात दाखल झाल्याचे कळताच त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. या दरम्यान सोशल मीडियावर अनेक मेसेजसही व्हायरल झाले.

गानसम्राज्ञी लतादीदींनी २८ सप्टेंबर रोजी ९०वा वाढदिवस साजरा केला. २००१ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी आतापर्यंत ३६ भारतीय भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड केली आहेत.