जो सूर ऐकत देशाच्या अनेक पिढय़ांना गाणं म्हणजे काय, हे कळलं, संगीतविश्वातील मातब्बर मंडळी ज्या सुरांना ‘ईश्वराचं देणं’ मानत वंदन करतात, त्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी  २८ सप्टेंबरला ८५व्या वर्षांत पदार्पण केले.
लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ साली मंगेशकर कुटुंबात झाला. त्या भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. हिंदी संगीत-विश्वात त्यांना ‘लता-दीदी’ म्हणून ओळखले जाते. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरूवात इ.स. १९४२ मध्ये झाली आणि ती कारकिर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, विसाहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे. भारताचा सर्वोच्च पुरस्कार ‘भारतत्न’ प्राप्त होणाऱ्या गायक-गायिकांमध्ये लताबाईंचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे.
लताने नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या किती हसाल (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटासाठी गायले, पण हे गाणे चित्रपटातून वगळले गेले. त्यानंतर इ.स. १९४५ मध्ये मुंबईत आल्यावर त्यांनी उस्ताद अमानत अली खॉ (भेंडीबाजारवाले) ह्यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यांनी वसंत जोगळेकरांच्या आपकी सेवामे (इ.स. १९४६) ह्या हिंदी चित्रपटासाठी पा लागूं कर जोरी हे गाणे गायले.

* या बातमी खालील प्रतिक्रिया बॉक्समध्ये शुभेच्छा नोंदवा आणि हो! त्यांनी गायलेले तुमचे आवडते गाणे नमूद करण्यास विसरू नका!