रानू मंडल यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून ते हिमेश रेशमिया यांनी त्यांना गाण्याची संधी देईपर्यंतचा प्रवास आपल्याला माहित आहेच. हिमेश रेशमियाने त्यांना त्याच्या चित्रपटासाठी ३ गाणी म्हणण्याची संधी दिली. रानू मंडल यांचं आयुष्यच यामुळे बदलून गेलं आहे. रातोरात त्यांच्या आवाजाची आणि गाण्याची चर्चा होते आहे. इक प्यार का नगमा है हे लता मंगेशकर यांचं गाणं गात असल्याचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता रानू मंडल यांच्या प्रसिद्धीबाबत, गाण्याबाबत पहिल्यांदाच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय आहे लता मंगेशकर यांची प्रतिक्रिया?
“मी गायलेली गाणी गाऊन, माझ्या नावामुळे आणि माझ्या कामामुळे कुणाचं भलं झालं तर मी स्वतःला भाग्यवान समजते. मात्र माझा या गोष्टीवर विश्वास आहे की एखादी गोष्ट कॉपी करुन, नक्कल करुन प्रसिद्धी मिळते मात्र ती प्रसिद्धी ते यश फार काळ टीकत नाही. अनेक उदयोन्मुख गायक, गायिका या ज्येष्ठ कलाकारांची गाणी म्हणतात. किशोरदा, मोहम्मद रफी, आशा भोसले, मुकेश यांचीही गाणी म्हटली जातात. त्यामुळे काही काळ ही गाणी म्हणणाऱ्या गायकांना लक्षात ठेवलं जातं. त्यांची चर्चा होते मात्र नंतर ती प्रसिद्धी दीर्घकाळ टीकत नाही”

‘आयएएनएस’ला दिलेल्या मुलाखतीत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी रानू मंडल यांच्याबाबत भाष्य केलं आहे. एवढंच नाही तर त्यांनी टीव्हीवरील म्युझिक शोजमधून पुढे येणाऱ्या गायकांबाबतही चिंता व्यक्त केली आहे. “सध्याच्या घडीला असे अनेक उदयोन्मुख गायक गायिका आहेत जे माझी गाणी खूप चांगल्या प्रकारे म्हणतात. मात्र किती गायक गायिका असे आहेत? ज्यांचं यश स्मरणात राहिलं? ” असाही प्रश्न लता मंगेशकर यांनी विचारला. “मला फक्त सुनिधी चौहान आणि श्रेया घोषाल ठाऊक आहेत” असंही त्या म्हणाल्या.

उदयोन्मुख गायक गायिकांना लता मंगेशकर यांनी सल्लाही दिला. त्या म्हणाल्या “तुम्ही तुमची गायन शैली निर्माण करा, सगळ्या गायकांची गाणी म्हणा मात्र स्वतःचं गाणं शोधा, आपली शैली तयार करा” यासाठी त्यांनी आशा भोसले यांचंही उदाहरण दिलं. त्या म्हणाल्या ” जर आशाने माझ्यापेक्षा वेगळ्या ढंगात गाणं गाण्याची जिद्द जोपासली नसती तर ती माझी सावली झाली असती. एखाद्या व्यक्तीमध्ये असलेली प्रतिभा त्या व्यक्तीला किती मोठ्या शिखरावर पोहचवते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आशा आहे,” असंही लता मंगेशकर यांनी म्हटलं आहे.