छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने आत्महत्या करुन जवळपास पाच वर्षे झाली आहेत. प्रत्युषाने आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. एकीकडे प्रत्युषाने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे तर दुसरीकडे तिच्या कुटुंबीयांनी प्रत्युषाची हत्या झाल्याचे म्हटले आहे.

प्रत्युषाचे वडील शंकर बॅनर्जी आणि आई सोमा बॅनर्जी यांनी नुकताच ‘आजतक’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी प्रत्युषाच्या निधनानंतर त्यांना मोठा धक्का बसला होता आणि अजूनही ते त्यातून सावरलेले नाहीत असे म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘मी घाबरले आणि राजला धक्का देऊन बाथरुममध्ये पळाले’, शर्लिन चोप्राने केला खुलासा

‘आता बोलण्यासारखं काय राहिले आहे? आम्ही काय बोलू? त्या घटनेनंतर आमच्या आयुष्यात जणू काही वादळच आले आणि ते आमचं सर्व काही घेऊन गेले. आमच्याकडे पैसेही उरले नाहीत. केस लढता लढता आम्ही सर्व काही गमावले आहे’ असे प्रत्युषाचे वडील म्हणाले.

पुढे ते म्हणाले, ‘प्रत्युषाशिवाय आमचं कुणी नाही. तिनेच आम्हाला मोठ्या उंचीवर पोहोचवले होते आणि आता पुन्हा जमिनीवर आलो आहोत. आयुष्य कसतरी पुढे सरकत आहे. आम्ही एका खोलीमध्ये राहत आहोत. प्रत्युषाची आई चाइल्ड केअर सेंटरमध्ये काम करत आहे. मी काही कथा लिहित असतो. पैशांची कमी आहे पण आम्ही हिंमत हरलो नाहीत.’