अक्षय कुमार व कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेला ‘लक्ष्मी’ हा चित्रपट आज (९ नोव्हेंबर) डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या हॉरर कॉमेडी चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. चित्रपटात अक्षय एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणार असून ट्रेलर व गाण्यांना प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.
‘कांचना’ या प्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. कांचना या चित्रपटाचा दिग्दर्शक राघवा लॉरेन्स यानेच हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. करिअरमधील ही सर्वांत अवघड व सर्वांत आव्हानात्मक भूमिका असल्याची प्रतिक्रिया अक्षयने एका मुलाखतीत दिली होती. अक्षय कुमारची ‘केप ऑफ गुड फिल्म्स’ ही निर्मिती संस्था, फॉक्स स्टार स्टुडिओज आणि तुषार कपूर यांनी मिळून चित्रपटाची निर्मिती केली आहे. यामध्ये अक्षय आणि कियारासोबतच अश्विनी काळसेकर, शरद केळकर, मनू रिशी आणि आयेशा रझा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
आणखी वाचा : प्रमोशन अर्ध्यावर…; वेळ मिळताच श्वानासोबत मस्ती करण्यास खिलाडी कुमार व्यस्त
चित्रपटाच्या नावावरून वाद
‘लक्ष्मी’ या चित्रपटाच्या नावावरून बराच वाद झाला. सुरुवातीला या चित्रपटाचं नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ असं होतं. या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर करणी सेनेने ‘लक्ष्मी बॉम्ब’ या नावावर आक्षेप घेत विरोध केला होता. तसंच श्री राजपूत करणी सेनेकडून वकील राघवेंद्र मेहरोत्र यांनी निर्मात्यांना नोटीस पाठवली होती. चित्रपट निर्मात्यांनी जाणूनबुजून ‘लक्ष्मी’ हे नाव शीर्षकात वापरल्याचा उल्लेख या नोटिशीत केला होता. हिंदू धर्मातील देवदेवतांचा अपमान केल्यामुळे भावना दुखाविल्याचं त्यात नमूद करण्यात आलं होतं . त्याचप्रमाणे या नावात बदल करण्याची मागणीही त्यांनी केली होती. करणी सेनेने विरोध दर्शविल्यानंतर चित्रपटाच्या टीमने या चित्रपटाचं नाव बदललं आहे. चित्रपटाच्या नावातील बॉम्ब हा शब्द हटवत. आता केवळ ‘लक्ष्मी’ असं नाव ठेवण्यात आलं आहे.