पुण्यात वाढलेला, मराठी मारवाडी तरुण ते अस्खलित मराठी बोलणारा-कविता करणारा, हिंदी-मराठी चित्रपट-वेबमालिकांतून उत्तम अभिनय करणारा अभिनेता जितेंद्र शकुं तला जोशी हा प्रवास असामान्यत्वाचा ध्यास घेऊन केला नव्हता. मात्र, या प्रवासात भेटलेल्या अनेक प्रतिभावंतांच्या संस्कारांनी आणि अनुभवांनी आपले जगणे समृद्ध केले. त्यातूनच माणूसपणाचा, जगण्याचा सूर सापडला, असे अभिनेता जितेंद्र जोशी यांनी आपला कलाप्रवास उलगडताना सांगितले.

काय.. कसा आहेस?, या सहज प्रश्नाने सुरुवात होऊन दोन मित्रांमध्ये गप्पांचा फड रंगावा, असाच काहीसा अनुभव बुधवारी, ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ वेबगप्पांमधून रसिकांना मिळाला. अभिनेता, कवी-गीतकार, सामाजिक भान जपणारे व्यक्तिमत्त्व अशी बहुआयामी प्रतिभा असलेल्या जितेंद्र जोशी या आपल्या मित्राला कधी विनोदातून, कधी कवितांमधून, कधी गमतीशीर प्रश्नांच्या फैरीतून बोलते करत लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी त्यांची वेगळीच बाजू रसिकांसमोर उलगडली. शाळेत मराठी भाषेत शिक्षण सुरू होते. मात्र भाषेची गोडी लागण्यासाठी व. पु. काळे, चि. वि. जोशी, आचार्य अत्रे यांच्यासारख्या दिग्गज साहित्यिकांची पुस्तके  हाती यावी लागली. नंतर मुंबईत आल्यावर मोहन वाघ यांनी बसवलेल्या ‘वाऱ्यावरची वरात’मध्ये भूमिका करण्याची संधी मिळाली. तिथून पुढे चंद्रकांत काळेंबरोबर ‘साजणवेळा’, ‘शेवंतीचे बन’ अशी नाटके  करण्याची संधी मिळाली आणि भाषेची चव कळायला लागली. याच प्रवासात शाहीर साबळे, विठ्ठल उमप यांच्यासारखी व्यक्तिमत्त्वे काय होती, हे समजून घेता आले. देशाच्या सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक जडणघडणीत मोलाचे योगदान देणारी मोठमोठी मंडळी इतर कोणत्याही राज्यांपेक्षा महाराष्ट्राने दिली. त्या भूमीत मी जन्माला आलो, हे आपले भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले. मी महाराष्ट्रात वाढलेला मराठी मारवाडी आहे, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली.

Senior educationist writer Meena Chandavarkar passed away
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे निधन
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
jun furniture poster
“या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा”; ‘जुनं फर्निचर’ मध्ये मराठी कलाकारांची मांदियाळी, पहिलं पोस्टर प्रदर्शित
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी असते. कलाकार म्हणून  मुंबईत आल्यावर इतरांप्रमाणेच खूप प्रयोग आणि पैसे मिळणे ही माझी एकमेव यशाची व्याख्या होती. मात्र, यशस्वी माणसांना जवळून अनुभवल्यावर आपली धारणा बदलत गेल्याचे त्यांनी सांगितले.

२००१ साली एका मुलाने बा. भ. बोरकरांची कविता ऐकवून दाखवली, तेव्हा त्यातले काहीही कळले नाही. मग जाणीवपूर्वक अभ्यास केल्यावर बोरकर, आरती प्रभू यांचे काव्य, त्यातील अर्थ समजून घेण्यापर्यंत पोहोचलो. त्याच अभ्यासातून नातेसंबंध, माणसे, निसर्ग, आपले अंतर्मन अशा अनेक गोष्टींचे आकलन होत गेले. तेव्हा खऱ्या अर्थाने नाटक-सिनेमा हा आपल्या जगण्याचा भाग आहे, केवळ तेच जगणे नाही हे खऱ्या अर्थाने लक्षात आल्याचे त्यांनी सांगितले.

अभिनेता म्हणून मी खूप भूमिका केल्या आहेत, खूप संघर्ष केला आहे, असा कुठलाही अभिनिवेश न बाळगता आजचे व्यावहारिक वास्तव आणि त्यातून अपरिहार्यपणे येणारा यशाचा अहंकार, अभिमान या सगळ्या गोष्टींकडे तटस्थपणे पाहण्याची दृष्टी कशी मिळत गेली हेही जितेंद्र जोशी यांनी विस्ताराने सांगितले. माणूस म्हटल्यावर त्याच्याकडून चुकाही होणार, अपयशही येणार हे स्वीकारून पुढे गेले पाहिजे. ते नाकारायची सवय मुलांना लावू नका, असेही त्यांनी यावेळी सांगितले. अनुभवातून आलेल्या शहाणपणाचे बोल उपदेशांतून ऐकवण्यापेक्षा आपल्या कवितांमधून थेट मांडणाऱ्या जितेंद्र जोशी यांच्यातला मनस्वी आणि तितकाच कलंदर माणूस या गप्पांमधून रसिकांनी अनुभवला.