विदूषक म्हटले की रंगरंगोटी केलेला, चित्रविचित्र कपडे घातलेला, आपल्या हालचालींनी लोकांना हसवणारा एक विनोदी चेहरा डोळ्यासमोर येतो. सर्कस, मालिका, चित्रपट, नाटक अशा विविध माध्यमांतून या चेहऱ्याच्या करामती आपण पाहिल्या. परंतु याच्या उलट याच चेहऱ्याचे भेदक स्वरूप ‘सुसाइड स्क्वॉड’, ‘द मॅन हू लाफ’, ‘द लिटिल प्रिंसेस’, ‘ईट’, ‘द मास्क’, ‘किलिंग जोक’ यांसारख्या अनेक हॉलीवूडपटांतून दिसले आहे. विनोद आणि भीती हे दोन्ही अनुभव देणारी विदूषक ही दृश्यमाध्यमातील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय व्यक्तिरेखा आहे. आजवर ‘सेझर रोमेरो’, ‘जॅक निकोल्सन’, ‘मार्क हॅमिल’, ‘जॉनी डेप’ यांसारख्या अनेक कलाकारांनी विदूषकाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या यादीत आता ऑस्कर पुरस्कार विजेता ‘लिओनार्दो दी कॅप्रिओ’ हे नाव जोडले जात आहे. वॉर्नर ब्रदर्सच्या ‘जोकर’ या अगामी चित्रपटात लिओनार्दो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. २०१८ मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होइल. त्याचा ‘द रेव्हनंट’ हा शेवटचा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर येणारा हा पहिला चित्रपट आहे. त्याला लहानपणापासूनच विदूषकाचे आकर्षण होते. त्यामुळे या चित्रपटाबाबत तो कमालीचा उत्साही आहे. त्याच्या मते विदूषकाचा अभिनय पडद्यावर साकारणे सोपे काम नाही. त्यासाठी खूप प्रशिक्षण व सरावाची गरज आहे. आजवर अनेक गुणवंत कलाकारांनी ही व्यक्तिरेखा पडद्यावर साकारल्यामुळे त्याला एक वेगळे प्रमाण प्राप्त झाले आहे. त्यामुळे अभिनय करताना त्या पात्राचे वजन लक्षात ठेवणे गरजेचे आहे. लिओनार्दोचा आजवरचा प्रवास लक्षात घेता जोकर या चित्रपटात तो काय कमाल करतो हे पाहण्याजोगे आहे.