रणबीर कपूरचा ‘संजू’हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ‘रॉय’, ‘तमाशा’, ‘बॉम्बे वेलवट’ असे रणबीरचे एका पाठोपाठ एक चित्रपट फ्लॉप गेल्यानंतर ‘संजू’ चित्रपट रणबीरच्या करिअरच्या दृष्टीनं खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. बॉलिवूडमध्ये बुडत चाललेली रणबीरच्या करिअरची होडी तारण्यासाठी संजू चित्रपट महत्त्वाचा ठरणार आहे. ‘सांवरिया’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या रणबीरनं त्यानंतर अनेक यशस्वी चित्रपट दिले. या चित्रपटमुळे रणबीरच्या करिअरचा आलेख उंचावत गेला. हे पाच चित्रपट कोणते ते आपण पाहू.

वेक अप सिड
२००९ साली आलेला वेक अप सिड हा चित्रपट रुपेरी पडद्यावर खूपच गाजला. रणबीरसोबत कोंकणा सेन या चित्रपटात मुख्य भूमिकेत होती. ऐशोआरामात वाढलेल्या श्रीमंत व्यावसायिकाचा मुलाची भूमिका त्यानं साकारली होती. शहरात करिअर घडवण्यासाठी आलेली कोंकणा या वाया गेलेल्या मुलाला करिअरची दिशा देते अशा कथानकावर हा चित्रपट आधारलेला होता. अनेकांनी हा चित्रपट प्रेरणादायी असल्याचं सांगत त्याचं कौतुक केलं होतं.

अजब प्रेम की गजब कहानी
२००९ साली आलेला अजब प्रेम की गजब कहानी हादेखील  चित्रपट सुपरहिट ठरला. राजकुमार संतोशी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं १३४ कोटींचा गल्ला जमावला होता. इथूनच रणबीर आणि कतरिनाच्या प्रेमकहाणीला सुरूवात झाली होती.

रॉकस्टार
इम्तियाज अली यांचं दिग्दर्शन असलेला रॉकस्टार हा चित्रपट २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामुळे अभिनयातले अनेक पुरस्कार त्याच्या वाट्याला आले. यात रणबीरच्या अभिनयाचं खूपच कौतुक झालं. चित्रपटाबरोबरच गाणीही हिट ठरली.

बर्फी
२०१२ साली आलेल्या बर्फी या चित्रपटानंदेखील रणबीरच्या करिअरला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. या चित्रपटानंदेखील रणबीरला सर्वोत्कृष्ट अभिनयाचे अनेक पुरस्कार मिळवून दिली. अनुराग बसू यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.

ये जवानी हे दिवानी
२०१३ साली आलेला ये जवानी हे दिवानी चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. अयान मुखर्जीनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटानं एकूण ३०० कोटींचा विक्रमी गल्ला जमवला होता.