करोनाच्या पाश्र्वभूमीवर अजूनही बंदिस्त नाटय़गृहांचा पडदा उघडण्यास परवानगी मिळाली नसल्याने कलाकारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. सिकांसाठीही मनोरंजनाचा मार्ग बंद झाला आहे. यावर उपाय म्हणून ‘ड्रीम कासल एन्टरटेन्मेंट’ने ‘ऑप्टिमस व्हर्च्युअल थिएटर’ (ओव्हीटी) ही संकल्पना आणली आहे. यात मराठी, हिंदी, इंग्रजी नाटकांचे थेट प्रक्षेपण एका संकेतस्थळावर केले जाईल. एका तिकिटात संपूर्ण कुटुंबाला याचा आनंद घेता येईल.

१३ जुलै रोजी सत्यदेव दुबे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ऑनलाइन कार्यक्रम पाहताना भूपेंद्र देशमुख यांना ही कल्पना सुचली. आतापर्यंत एकाच कॅ मेऱ्याने नाटकाचे चित्रीकरण करून ते यू-टय़ूबवर उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र यात नाटय़गृहात जाऊन नाटक पाहण्याचा आनंद अनुभवता येत नाही. त्यामुळे ‘ओव्हीटी’साठी थेट प्रक्षेपण करताना अनेक कॅ मेऱ्यांद्वारे चित्रीकरण केले जाणार आहे. मात्र, तरीही हे नाटक एखाद्या मालिका किंवा सिनेमाप्रमाणे न दिसता प्रत्यक्ष नाटकाप्रमाणेच दिसेल.

गोरेगावच्या ‘केशव गोरे सभागृहा’त पुढील तीन महिने नाटकाचे प्रयोग होतील. त्यासाठी नोंदणी केल्यास माफक दरात एकच तिकीट खरेदी करून त्यात संपूर्ण कुटुंबाला नाटक पाहता येईल.

नाटक पाहताना तांत्रिक अडचणी आल्यास तिकीट वाया जाऊ दिले जाणार नाही. अशा प्रेक्षकांना पुन्हा नाटकाची लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे.

२५ सप्टेंबरला रात्री ८.३० वाजता ‘स्नॅपशॉट्स फ्रॉम अ‍ॅन अल्बम’ या इंग्रजी नाटकाने या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन शिव सुब्रमण्यम् यांनी केले आहे. छायांकन स्वप्निल शेटे यांनी, प्रकाशयोजना अमोघ फडके यांनी आणि संगीत ओमकार गोखले यांनी केले आहे.

नाटकांच्या वेळा..

* स्नॅपशॉट्स फ्रॉम अ‍ॅन अल्बम

२५ सप्टेंबर- रात्री ८.३० वाजता

२६ सप्टेंबर- सायं. ७.३० वाजता

* मला उमगलेले गांधी (अभिवाचन कार्यक्रम)

२ ऑक्टोबर – सायं. ७.३० वाजता

तिकीट मिळवण्यासाठी http://www.ticketkhidakee.com

येथे क्लिक करा..