करोना विषाणूमुळे देशात जारी केलेल्या लॉकडाउनचा हा चौथा टप्पा आहे. त्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने सामान्य नागरिकांप्रमाणेच कलाविश्वातील सेलिब्रिटीदेखील घरीच बसले आहेत. घरी राहून हे सेलिब्रिटी नवनवीन गोष्टी शिकत असून अनेक जण घरातील स्त्रियांना घरकामात मदत करत आहेत. लॉकडाउनच्या काळात सेलिब्रिटी करत असलेली प्रत्येक गोष्ट चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. मात्र या काळात घरातली स्त्रियांच्या कामाविषयी आणि त्यांच्या कष्टाविषयी अभिनेता प्रशांत दामले यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. तसंच घरातील इतर कामांच्या तुलनेत सगळ्यात अवघड काम कोणतं हेदेखील त्यांनी सांगितलं आहे.

अलिकडेच प्रशांत दामले यांनी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवर दिलखुलासपणे चर्चा केली. त्यांची मत मांडली, तसंच घरात राहून ते नेमकं काय करत आहेत हेदेखील त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे घरातील सगळ्यात अवघड काम कोणतं हे त्यांनी सांगितलं असून त्यांचं उत्तर एकून एकच हशा पिकला.

“सध्या लॉकडाउन असल्यामुळे मी सुद्धा इतरांप्रमाणेच घरी आहे, सुरक्षित आहे. या काळात मी विविध गोष्टींमध्ये मन रमवत आहे आणि शक्य होईल तसं पत्नीला घरकामात मदत करत आहे. मात्र या सगळ्या कामांमध्ये दुधाचं पातेलं घासणं हे सगळ्यात कठीण काम आहे”, असं प्रशांत दामले यांनी सांगितलं.

दरम्यान, प्रशांत दामले हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि तितकंच नावाजलेलं नाव आहे. नाटकावर अतोनात प्रेम असणाऱ्या या अभिनेत्याने रंगमंचावर अनेक भूमिका गाजवल्या आहेत. त्यामुळे नाटक आणि प्रशांत दामले हे जणू एक समीकरणचं झाल्याचं पाहायला मिळतं.