चित्रपटसृष्टीमध्ये स्वत: स्थान निर्माण केलेला प्रत्येक कलाकार त्याच्या विशिष्ट भूमिकेसाठी ओळखला जातो. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे मकरंद देशपांडे. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारणारा मकरंद देशपांडे ट्रकभर स्वप्न या आशयघन चित्रपटामध्ये पहिल्यांदाच एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर आला. चौकोनी कुटुंबाची आणि त्यांच्या स्वप्नांची कथा सांगणारा हा चित्रपट या लॉकडाउनच्या काळात पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सध्या लॉकडाउन सुरु असल्यामुळे घरी बसलेल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी झी टॉकीजवर चित्रपटांची मेजवानी मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. झी टॉकीजवर या काळात वर्ल्ड प्रीमियर सुरु असून त्यात नवीन-जुने असे अनेक चित्रपट पाहायला मिळत आहेत. यातच रविवारी, ३१ मे रोजी सकाळी १२ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

प्रमोद पवार दिग्दर्शित ‘ट्रकभर स्वप्न’ या चित्रपटात सर्वसामान्य जोडप्याच्या स्वप्नांचा प्रवास उलगडला आहे. या चित्रपटामध्ये मकरंद-क्रांती प्रमुख भूमिकेमध्ये झळकणार आहेत. अभिनेता, दिग्दर्शक अशी ओळख असलेल्या मकरंदने आतापर्यंत मराठी-हिंदीसह तेलुगू, कन्नड, मल्याळम आदी दाक्षिणात्य प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. मात्र या चित्रपटात तो वेगळ्या अंदाज प्रेक्षकांसमोर आला आहे.