‘आर्किटेक्चर’ची पदवी मिळवल्यानंतर त्यांनी स्वत:चा ‘इंटीरियर डेकोरेशन’चा व्यवसाय सुरू केला. एकीकडे ‘इप्टा’ नाटय़संस्थेच्या माध्यमातून हिंदी नाटकांमधून काम करणे सुरू होते. पुढे त्यांनी मराठी रंगभूमीसह चित्रपटातून विशेषत: हिंदी चित्रपट, मालिका आणि विविध भाषांतील चित्रपटातही वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. काही पौराणिक मालिकांमधूनही ‘दर्शन’ दिले. सरला चॅरिटेबल ट्रस्ट निर्मित (निर्माते इंदूभाई शहा व पांडुरंग दीक्षित, दिग्दर्शक-अशोक भूषण आणि पटकथा-मनोजकुमार) ‘त्या’ एका चित्रपटामुळे ज्यांचे संपूर्ण आयुष्य बदलले आणि ज्यांना ‘साईबाबा’ अशी ओळख मिळाली ते ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी आजच्या ‘पुनर्भेट’चे मानकरी आहेत.

एखादा कलावंत विशिष्ट भूमिकेत लोकप्रिय झाला की कलाकार व त्याची भूमिका याचे अतूट नाते तयार होते. नंतर त्या कलाकाराने कितीही वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या तरी प्रेक्षक कलाकाराला त्या विशिष्ट नावानेच ओळखतात. आज चाळीस वर्षांनंतरही सुधीर दळवी बॉलीवूड आणि सर्वसामान्य रसिक प्रेक्षकांमध्येही ‘साईबाबा’ म्हणूनच ओळखले जातात. त्यामुळे गप्पांची सुरुवात साहजिकच ‘शिर्डी के साईबाबा’ या विषयानेच झाली.

चाळीस वर्षांपूर्वीच्या त्या आठवणींचा पट उलगडताना दळवी म्हणाले, ‘शेर शिवाजी’ हे हिंदी नाटक मी केले होते. यात ‘मिर्झा राजे जयसिंह’ ही भूमिका करत होतो. हे नाटक पाहायला अभिनेते श्रीकांत मोघे यांच्या सासऱ्यांचे धाकटे बंधू व ‘शिर्डी के साईबाबा’ चित्रपटाचे एक निर्माते आणि संगीतकार पांडुरंग दीक्षित आले होते. प्रयोग झाल्यानंतर ते आत आले आणि त्यांनी मला घरी भेटायला ये असा निरोप दिला. दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी गेलो. ‘या बाबा’ असे म्हणून त्यांनी माझे स्वागत केले. मी मागे पाहिले. मला वाटले माझ्या मागे कोणीतरी असतील त्यांना दीक्षितांनी ‘बाबा’ अशी हाक मारली असेल. त्यावर दीक्षितांनी ‘मी तुम्हालाच बाबा म्हणालो’ असे सांगून ‘शिर्डी के साईबाबा’ चित्रपटात तुम्हाला ‘साईबाबा’ ही भूमिका करायची आहे, हेही लगोलग सांगून टाक ले आणि आश्चर्याचा धक्काच दिला. त्यांनी मला ‘साईचरित्र’ आणि साईबाबांवरील अन्य साहित्यही वाचण्यासाठी दिले. त्यांच्याकडून मी दोन दिवसांची मुदत मागून घेतली आणि कळवतो असे सांगितले.

साईबाबा व त्यांच्याविषयी मला माहिती होती. मी त्यांचा भक्त होतो किंवा श्रद्धेने त्यांची उपासना करत होतो असे मात्र काही नव्हते. पण माझ्या बायकोच्या माहेरी साईबाबांवर श्रद्धा होती. माझी पत्नी सुहास  म्हणाली, ‘साईबाबां’ची भूमिका हे तुमच्यासाठी आव्हान आहे. तुम्ही ते  स्वीकारावे असे मला वाटते. मीही विचार केला आणि दोन दिवसांनी दीक्षितांना माझा होकार कळवला. दरम्यान मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ रंगभूषाकार दिवंगत कृष्णा बोरकर यांनी मला ‘साईबाबा’ यांची रंगभूषा केली. ती रंगभूषा व ‘साईबाबा’ यांच्या वेशभूषेतील छायाचित्रे इंदूभाई शहा, दीक्षित, अशोक भूषण, मनोजकुमार यांना दाखवण्यात आली. त्या सर्वानीही हिरवा कंदील दिला आणि माझ्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली. ‘साईबाबा’ साकारले तेव्हा मी अवघा ३७ वर्षांचा होतो. ‘साईबाबा’ करताना त्यांच्यावरील सर्व साहित्य वाचून काढले होतेच. पण कुमारसेन समर्थ दिग्दर्शित ‘साईबाबा’ हा चित्रपट व त्या चित्रपटात दत्तोपंत आंग्रे यांनी साकारलेले ‘साईबाबा’ पाहिले. २० मे १९७६ मध्ये चित्रपटाचा मुहूर्त होऊन चित्रीकरणाला सुरुवात झाली आणि ४ मार्च १९७७ मध्ये ‘शिर्डी के साईबाबा’ चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट खूप चालला, लोकप्रिय झाला. त्यातील गाणीही गाजली. माझ्या भूमिकेचे कौतुक झाले. मला ‘साईबाबा’ अशीच ओळख मिळाली. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि परदेशातही माझे नाव माहिती झाले. जिथे कुठे जाईन तिथे लोक पाया पडू लागले, सत्कार होऊ लागले. सुरुवातीला मला खूप अवघडल्यासारखे वाटायचे. पण हा नमस्कार ‘सुधीर दळवी’ याला नाही तर त्याने साकार केलेल्या ‘साईबाबां’ना आहे हे मी माझ्या मनावर नेहमीच कोरून ठेवले. ते यश, प्रसिद्धी कधीही डोक्यात जाऊ दिली नाही. ‘साईबाबा’ यांची भूमिका साकार केलेला एक कलाकार आहे, त्यापेक्षा अधिक काहीही नाही, हे मी कायम लक्षात ठेवले. ‘साईबाबा’ यांच्याविषयी मला असे वाटते की त्यांनी त्या काळात राष्ट्रीय एकात्मतेचा पाया घातला. विविध जात, धर्म आणि पंथाच्या लोकांना एकत्र केले. कोणतीही जात-पात व धर्म मानला नाही. एका हंडीत तयार केलेले जेवण सगळ्यांनी एकत्र बसून जेवायची पद्धत त्यांनी सुरू केली. साईबाबा यांनी कोणाकडे कधीही व काहीही मागितले नाही. स्वत:चा ‘आश्रम’ सुरू केला नाही. निरपेक्ष आणि नि:स्वार्थी वृत्तीने त्यांनी काम केले. साईबाबा यांचे काम खूप मोठे आहे आणि म्हणूनच मी ‘साईबाबां’ची भूमिका स्वीकारली.

‘साईबाबां’च्या प्रतिमेतून पुढे बाहेर पडायला थोडा त्रास झाला का?, यावर दळवी यांनी सांगितले, ‘हो तसे झाले खरे. कारण त्यानंतर माझ्याकडे पौराणिक-धार्मिक स्वरूपाच्याच भूमिका येत राहिल्या. त्यामुळे या प्रतिमेतून बाहेर पडण्यासाठी मिळतील त्या विविध भूमिका मी स्वीकारायचे ठरवले. त्यानुसार हिंदी-मराठी चित्रपटात ‘पोलीस आयुक्त’, ‘खलनायक’ किंवा ‘चरित्रात्मक’ भूमिका (वडील, आजोबा वगैरे) करून त्या प्रतिमेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.

दळवी कुटुंबीय मूळचे कल्याणचे. त्यांचे आजोबा १९०२ मध्ये नाशिकजवळील पिंपळगाव-बसवंत येथे वकिली व्यवसायासाठी गेले. सुधीर दळवी यांचे वडील प्रभाकर हे टेक्स्टाईल इंजिनीअर होते. दळवी कुटुंबातील सर्वजण उच्चशिक्षित. नाटक  किंवा चित्रपट, अभिनय या क्षेत्राशी कोणीही संबंधित नव्हते. दळवी यांची आत्या उषा सराफ या  नाटकातून काम करायच्या. त्यामुळे तो वारसा त्यांना आत्याकडून मिळाला. दळवी यांचे शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले. दादरच्या किंग जॉर्जमधून (आत्ताचे राजा शिवाजी विद्यालय) अकरावी मॅट्रिक झाल्यानंतर ‘रचना संसद’मधून त्यांनी ‘आर्किटेक्चर’चे शिक्षण घेतले आणि पदवी मिळवली. लहानपणी चित्रपट विशेषत: पौराणिक चित्रपट त्यांनी खूप पाहिले. घरी आल्यानंतर चित्रपटातील विविध पात्रांची नक्कल घरात आणि मित्रांना ते करून दाखवायचे. भविष्यात त्यांच्यातील कलाकाराचा व अभिनयाचा पाया तिथे घातला गेला.

हिंदी व नंतर मराठी रंगभूमीवरील कारकीर्दीबाबत त्यांनी सांगितले, ‘आर्किटेक्चर’ झाल्यानंतर ‘इंटिरिअर डेकोरेशन’चा व्यवसाय सुरू केला होता. मुंबईत भुलाबाई मेमोरियल इन्स्टिटय़ूटमध्ये काही कामानिमित्त जाणे झाले. माझे एकूण व्यक्तिमत्त्व पाहून ‘नाटकात काम करणार का?’ अशी विचारणा केली गेली. ही विचारणा कोणी केली असेल तर साक्षात पं. सत्यदेव दुबे यांनी. नक्कल करणे, अभिनय याची कुठेतरी आवड होतीच. समोर आलेल्या संधीला मी हो म्हटले. त्यांनी मला डॉ. धर्मवीर भारती लिखित ‘अंधा युग’ या नाटकातील काही ओळी व उतारे वाचायला सांगितले. त्यानंतर याच नाटकात काम करण्याची संधी मिळाली. पुढे ज्येष्ठ अभिनेते ए. के. हंगल यांच्याशी परिचय झाला. तेव्हा ते ‘इप्टा’ या संस्थेमध्ये कार्यरत होते. इथेच अभिनेते संजीव कुमारशी ओळख झाली. तोही तेव्हा ‘इप्टा’मध्ये होता. संजीव कुमारकडून खूप काही शिकायला मिळाले. नंतर ‘डमरू’, ‘आषाढ का एक दिन’आणि अन्य काही हिंदी नाटके केली. ‘इप्टा’मध्ये तांत्रिक गोष्टीही शिकायला मिळाल्या. दरम्यान अभिनेते व दिग्दर्शक प्रभाकर पणशीकर यांनी माझ्या आत्याला निरोप दिला आणि त्यांनी मला भेटायला ये असे सांगितले. आत्या तेव्हा पणशीकरांच्या संस्थेत नाटकातून काम करत होती. पणशीकरांना भेटायला गेलो. ज्येष्ठ नाटककार वि. वा. शिरवाडकर यांच्या ‘वीज म्हणाली धरतीला’ या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. व्यावसायिक मराठी रंगभूमीवरचे माझे पहिले नाटक. पुढे ‘कटय़ार काळजात घुसली’, ‘तो मी नव्हेच’च्या काही प्रयोगातही मी होतो. अभिनेता श्रीकांत मोघे यांच्यामुळे ‘शेर शिवाजी’ या हिंदी नाटकात ‘मिर्झा राजे जयसिंग’ साकारायला मिळाला.  १९७० ते १९७६ या काळात मी मराठी रंगभूमीवर वावरलो. ‘वादळ’, ‘संत तुकाराम’, ‘तो राजहंस एक’, ‘आई म्हणोनी कोणी’, ‘राजू तू खरं सांग’ आणि अन्य काही नाटके केली. नाटकाचे दौरे, बाहेरगावचे प्रयोग यामुळे नाटक कमी केले. पुढे हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. तिथे ‘चरित्रात्मक अभिनेता’ म्हणून स्थिरावलो.

देव आनंद (लूटमार), अमिताभ बच्चन (तुफान, पुकार), राजकुमार (कर्मयोगी) आणि त्या काळातील सर्वच प्रथितयश अभिनेते व अभिनेत्री यांच्याबरोबर दळवी यांनी हिंदीत काम केले. सुमारे ६० मराठी चित्रपट, २०० हून अधिक हिंदूी चित्रपट आणि काही हिंदी मालिका त्यांच्या नावावर जमा आहेत. ‘शिव महापुराण’, ‘ओम नम: शिवाय’ आणि ‘रामायण’या पौराणिक मालिकाही त्यांनी केल्या. ‘शिर्डी के साईबाबा’नंतर ‘साईबाबा’ यांच्यावरच निघालेल्या दोन चित्रपटांतूनही त्यांनी ‘साईबाबा’ साकारले. गुजराथी, भोजपुरी, मारवाडी राजस्थानी, बंगाली आदी विविध भाषांतील चित्रपटांतूनही त्यांनी कामे केली. सर रिचर्ड अ‍ॅटेनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटात त्यांनी ‘पोलीस कमिशनर’ रंगवला होता. ‘क्यों की सॉंस भी कभी बहू थी’ या लोकप्रिय हिंदी मालिकेत दळवी यांनी साकारलेली ‘बापूजी’ ही भूमिका लोकप्रिय झाली. एक वर्ष आठ महिने इतक्या दीर्घ कालावधीसाठी मालिकेत त्यांची भूमिका होती. अलीकडेच ‘अ‍ॅण्ड टीव्ही’वर ‘बडी देवरानी’ ही मालिका त्यांनी केली.

बाबा आणि बुवा यांचे वाढते प्रस्थ आणि सध्या प्रसारमाध्यमात एका बाबाविषयी सुरू असलेली चर्चा या पाश्र्वभूमीवर दळवी यांना विचारले असता ते म्हणाले, या बाबा किंवा बुवांकडून लोकांच्या कमकुवत मनोवृत्तीचा गैरफायदा घेतला जातो. सध्याच्या जीवनात प्रत्येकाला ताण-तणावांचा सामना करावा लागतो. चिंता, काळजी, असुरक्षित भावनेने अनेकांना ग्रासलेले आहे. त्यांच्या या असहायतेचा गैरफायदा हे बाबा-बुवा घेतात. त्यामुळे प्रत्येकाने कोणत्याही बाबा-बुवावर डोळे झाकून विश्वास ठेवू नये. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा असू नये. तुमची श्रद्धा डोळस असली पाहिजे. शिर्डीच्या साईबाबा यांनी ‘श्रद्धा आणि सबुरी’ संदेश दिला असून तो सर्वानी लक्षात ठेवावा.

दळवी यांची पत्नी सुहास आणि मुलगा रोहित हे दोघेही उच्च विद्याविभूषित आहेत. नोकरीच्या निमित्ताने रोहितचे वास्तव्य विदेशात असते. वयाच्या ७८ व्या वर्षांच्या या टप्प्यावर मागे वळून पाहताना काय वाटते, असे विचारले असता दळवी म्हणाले, जे मिळाले त्यात आनंदी, समाधानी आणि कृतार्थ आहे.

आपले उर्वरित आयुष्य जर सुखात घालवायचे असेल तर आयुष्यात केलेल्या चुकांपेक्षा तुम्ही ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्या कायम लक्षात ठेवा. म्हणजे उर्वरित आयुष्य सुखात व आनंदात जाईल. माझ्या आनंदी जीवनाचा हाच मंत्र असल्याचे सांगत त्यांनी गप्पांचा समारोप केला.