|| रवींद्र पाथरे

‘अंत झाला अस्ताआधी जन्म एक व्याधी वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी..’ आरती प्रभूंच्या कवितेतल्या या ओळी अनेकांच्या आयुष्याला चपखल लागू पडतात. आपल्याला आजूबाजूला अशी कित्येक माणसं दररोज पाहायला मिळतात, की जी का जगताहेत आणि कोणत्या आशेवर आला दिवस ढकलताहेत, असा प्रश्न पडतो. त्यांच्या आयुष्यात ना कधी काही चांगलं घडत; ना ती कधी गरिबी, अपयश, ताणलेले नातेबंध, नकोसेपण, अवहेलना, तिरस्कृत जगणं या चक्रातून बाहेर पडत. तरीही ही माणसं जगत असतात. कोणता चिवट अन् जिवट धागा त्यांना जगायला उद्युक्त करतो, न कळे. किडय़ामुंग्यांचं जिणं जगणारी अशी असंख्य माणसं साठ-सत्तरच्या दशकांत मुंबईत गिरणगावातील चाळींत, उपेक्षित-वंचितांच्या वस्त्यांमध्ये पाहायला मिळत. त्यांना ना कधी कुणाकडून सहानुभूती मिळाली, ना कधी सन्मान. खरं तर त्यांना सहानुभूतीची गरजही नव्हती. हवा होता माणूस म्हणून किमान सन्मान. त्यासाठी ती भुकेली होती. पण परिस्थितीच्या होरपळवणाऱ्या चटक्यांमध्ये त्यांची ती संवेदनादेखील बोथट व बधीर झाली होती. आजही अशी माणसं सर्वत्र दिसतात. फक्त परिस्थितीचं चित्र थोडंसं वेगळं आहे. भौतिक संपन्नता आणि सुबत्तेचं अजीर्ण झालेली, ‘स्व’भोवतीच पिंगा घालणारी ही माणसं नॉर्मल जगणं विसरलीयेत. ती रेसचे घोडे झालीयेत. थांबले की संपणारे. जगण्यातलं निवांतपणा, शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य हरवलेली, नातेसंबंधांतला ओलावा, प्रेम गमावलेली अशी ही माणसं साठ-सत्तरच्या दशकांतल्या त्या माणसांपेक्षा फारशी वेगळी नाहीयेत. असलंच तर त्यांचं जिणं त्यांच्यापेक्षाही अधिक निर्थक झालंय. असो.

Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…

साठ-सत्तरच्या दशकांतली तेव्हाची ती माणसं विजय तेंडुलकर, भाऊ पाध्ये, नामदेव ढसाळ, बाबुराव बागुल आदींच्या साहित्यातून अनुभवायला मिळतात. गंगाधर गाडगीळांनीही कनिष्ठ मध्यमवर्गीयांसंबंधी लिहिलेल्या कथांतूनही ती भेटतात. अलीकडे जयंत पवार यांच्या जोमदार कथांतून ती पुन्हा नव्यानं अवतरताना दिसतात. त्याचं कारण जयंत पवार यांचा जन्म, जडणघडण जिथं झाली त्या गिरणगावानं, तिथल्या माणसांनी आणि त्यांच्या जगण्यानं त्यांचा पिच्छा पुरवलाय. जणू त्यांच्या श्वासांमध्ये ती वसली आहेत. याचं कारण कधीकाळी तेही या विश्वाचा एक हिस्सा होते. साहजिकच या उपेक्षित, वंचितांचं जगणं जयंत पवारांचं लेखनविषय न ठरतं तरच नवल. ‘जन्म एक व्याधी’ ही त्यांची कथा यातूनच जन्मलीय. कणकवलीतील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या सहकार्याने कबीर आर्ट्स निर्मित व रघुनाथ कदम दिग्दर्शित ‘जन्म एक व्याधी’ हा या कथेवरील एकपात्री दीर्घाक मंचित केला गेला आहे. तो पाहण्याची संधी नुकतीच मिळाली.

कथेचा निवेदक व अभिन्न हिस्सा असलेला लेखक ही कथा सांगतो आहे. मुंबईत लोअर परेलमधील एका चाळीतल्या दोन खोल्यांत निवेदक व त्याचे कुटुंबीय तसंच त्याचे चुलते, चुलत्या आणि चुलतभावंडं राहतात. लेखकाच्या वडलांनी- दाजींनी दोन्ही खोल्या घेतलेल्या. लहान खोलीत दाजी, त्यांची पत्नी माई आणि त्यांची मुलं राहतात. तर दुसऱ्या मोठय़ा खोलीत दाजींचे दोन भाऊ व त्यांचे कुटुंबीय! एकत्रित कुटुंबापायी व भावांच्या परिस्थितीची जाण असल्याने दाजींनी कधी त्या खोलीवर आपला हक्क सांगितला नाही. मात्र, त्यांच्या पश्चात माईंना आपल्या वाढत्या कुटुंबाकरता ती खोली हवी आहे. पण एकत्रित कुटुंबाच्या नैतिक भिडेखातर त्या थेटपणे खोली खाली करून मागू शकत नसल्यानं सतत भांडणं आणि दोन्ही घरांत ताणलेले संबंध ही नित्याची गोष्ट झालेली. असं असलं तरी या दोन कुटुंबांत परस्परांकडे जाणं-येणं, व्यवहार सुरूच असतात. परिस्थितीनं नाडलेल्या, काहीच चांगलं घडत नसलेल्या या कुटुंबांच्या भोवतालचं वातावरणही तसंच आहे. रितं. उदास. गोठलेलं.

या सगळ्याकडे कथेचा निवेदक आज जरी त्रयस्थ व तटस्थ नजरेनं पाहू शकत असला तरी त्या वेळी मात्र तो या वातावरणामुळे हताशा, बेचैनी व अस्वस्थतेनं ग्रासलेला होता. मात्र ही स्थिती बदलण्यासाठी आपण काहीच करू शकत नाही याची तीव्र बोच त्याला लागून राहिलेली. किडय़ामुंग्यांचं निर्थक आयुष्य जगणाऱ्या या घरातलं एखादं माणूस गेलं की ‘सुटला बिचारा/ बिचारी!’ हाच विचार त्याच्या मनात येई. पण मागे राहिलेल्या माणसांची रखडपंची मात्र मागच्या पानावरून पुढे सुरूच असे. त्यांच्या जगण्याला कोणताच अर्थ नसतानाही ती जगत होती.. जगणार होती.

अशात एके दिवशी आबा (थोरले चुलते) गेल्यावर दादा घरी येतो. दादा हा आबांचा थोरला मुलगा. बऱ्याच वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला. फिल्म लाइनमध्ये मेकअपमन असलेला दादा दिसायला देखणा होता. परंतु दारूच्या व्यसनापायी वाया गेला होता. पहिल्यापासूनच अत्रंगी धंदे करून घरच्यांना मान खाली घालायला लावणारा असा हा दादा. त्याच्या या वागण्यामुळेच त्याला घर सोडावं लागलेलं. आबांच्या मृत्यूनंतर अचानक दादा उगवतो आणि घरी परतण्याचं सुतोवाच करतो. त्यावर कुणीच ‘हो/नाही’ काही प्रतिक्रिया देत नाहीत. तो परत येणार म्हणजे आपल्या हक्काच्या घरावर आणखी एक दावेदार वाढणार म्हणून माई मात्र मनोमन संतप्त झालेली. मोठय़ा खोलीतलेही त्याचं थंडेच स्वागत करतात.

असं असूनही दादा घरी परत येतो. आपल्या दोन लहान मुलांसह! बायकोला वसईलाच सोडून. दादाची पहिली बायको फिल्म लाइनमधली होती. एक्स्ट्राचं काम करणारी. पण ती त्याच्या व्यसनापायी त्याला सोडून गेलेली. तिला एक मुलगाही झालेला. पण त्यांनी कधीच या घराशी संबंध ठेवले नाहीत. त्यानंतरची ही दुसरी बायको दादाने कुठे गटवली, कुणास ठाऊक. दिसायला यथातथा. बाहेर नको ते धंदे करणारी. तिच्यापासून दादाला दोन मुलं झालेली. शंभू आणि भारती. त्यांना घेऊनच दादा घरी परत आलेला. आपण दारू कायमची सोडल्याचं सांगून तो सुधारण्याची हमी देतो. तसं तो वागतोही. काहीशा अनिच्छेनंच, पण मोठं मन करून घरातले त्याचा, त्याच्या मुलांचा स्वीकार करतात. पांडुभाऊ आणि विद्यावहिनींना मूल नसल्यानं शंभू आणि भारतीचा ते मुलांप्रमाणे सांभाळ करतात. दोन्ही मुलंही गुणी. परिस्थितीनं समंजस झालेली. हळूहळू घरातलं वातावरण स्थिरावत असतानाच नेमकी दादाची नोकरी जाते. तो दिवसभर घरीच पडून राहू लागतो.

..आणि एके दिवशी घरात तो आणि वहिनी दोघंच असताना तो वहिनीचा हात धरतो. वहिनी चिडतात. बिथरतात. पोलिसांना बोलवतात. दादा घडल्या प्रकाराने कमालीचा शरमिंदा झालेला. त्याच्या मनाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडालेल्या. दुसऱ्याच दिवशी तो मुलांना घेऊन घर सोडतो. कायमचं.

त्यानंतर काही दिवसांनी येते ती थेट त्याच्या मृत्यूचीच बातमी.

जयंत पवार यांनी प्रथमपुरुषी निवेदनातून ही कथा सांगितली आहे. लेखकाच्या नजरेतून सांगितल्या गेलेल्या या कथेत प्रत्यक्ष त्याच्या समोर घडलेलं, सांगोवांगीचं आणि काळाच्या ओघात स्मरणातून धूसर झालेलं वास्तव त्याने कथन केलंय. या सगळ्यावर लेखक एक नाटक लिहू इच्छित होता. त्याचा एक सीन त्याने लिहिलाही होता. परंतु पुढे ते अर्धवटच राहिलं. नंतर लेखकाच्या (निवेदकाच्या) आयुष्यात प्रत्यक्ष त्याने पाहिलेलं, अनुभवलेलं, सांगोवांगीचं तसंच नाटकाच्या सोयीकरता वाकवलं/ दुरुस्त केलं गेलेलं वास्तव यांची एकच सरमिसळ होते. त्यामुळे ही कथा म्हटलं तर वास्तवातली, म्हटलं तर लेखकानं कळत/ नकळत काही कल्पित त्यात मिसळलेली अशी मिश्र कथा आहे. जगणं व्याधीसमान झालेल्या माणसांची ही गोष्ट आहे. त्यांचे क्षुल्लक रागलोभ, व्यथा-वेदना, फरफटलेपण आणि हताशा असं सारंच या कथेत चित्रदर्शी शैलीत आलेलं आहे. आयुष्याची ससेहोलपट होऊनही ही माणसं जगत राहतात. तरीसुद्धा आत्महत्येचा विचार मात्र त्यांच्या मनात कधीच येत नाही. कदाचित ती हिंमत नसल्यानं असेल, पण ती अर्थहीन जगत राहतात. आणि एके दिवशी मरून जातात. काळाच्या पटावर कसलाही मागमूस न ठेवता! खरं तर अशी निर्थक आयुष्य जगलेली माणसं कथेचा विषय होऊ शकतात? तर- होय. दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात असं निर्थक, पोकळीयुक्त आयुष्य जगणाऱ्या युरोपातील सर्वसामान्य माणसांवरच असंख्य कलाकृती निर्माण झाल्या. आणि त्या गाजल्याही. त्यांच्या जगण्यातल वैय्यथ्र्य लोकांचं हृदय स्पर्शून गेलं.

पण इथे मात्र तसं घडत नाही. ही माणसं का जन्मली, का जगली, कशी तगली, हे प्रश्न उपस्थित करणं हाच या कथेचा गाभा आहे. असंही जगणं असतं, हे दाखवणारा. मानवी आयुष्याचा एक सोलीव कंद जयंत पवार आपल्यासमोर उलगडतात. ते वाचताना (इथं.. पाहताना!) प्रचंड मानसिक क्लेश होतात. हे विश्व वाचक/ प्रेक्षकाच्या अनुभवांतलं असेल तर अधिकच वेदना होतात. नसेल, तरी मानवी जीवनातलं हे भीषण वास्तव पाहून भंजाळायला होतंच. नाटक संपलं तरी बराच काळ ही माणसं आपला पिच्छा सोडत नाहीत. यातच या कथेचं यश आहे.

दिग्दर्शक रघुनाथ कदम यांनी हे वास्तव अचूक चिमटीत पकडलं आहे. त्याला नाटय़ात्मक फुलोरा न देता त्यांनी थेटपणे ते नाटकात मांडलं आहे. मिलचा भोंगा, बाहेर सार्वजनिक कार्यक्रमांत लावलेल्या लाऊडस्पीकरवरची गाणी अशा तऱ्हेनं  मोजक्याच  पाश्र्वसंगीताचा वापर वातावरणनिर्मितीकरता केला गेला आहे. (पाश्र्वसंगीत : शशिकांत कांबळी) चाळीतील खोल्यांच्या सूचनाकरता लोखंडी कॉट, दरवाजाच्या फ्रेम्स, व्हरांडय़ासाठी लेव्हल्स असं साधंच नेपथ्य योजलेलं आहे. (नेपथ्य- रघुनाथ कदम) कथेचा मूड निर्माण करण्यासाठी योजलेल्या प्रकाशयोजनेत काळोख्या खोल्यांचं अंधारलेपण प्रकर्षांनं जाणवतं. (प्रकाश- धनराज दळवी)

नट निलेश पवार यांनी हे एकपात्री नाटय़ उत्तम पेललं आहे. निवेदक व लेखक तसंच विविध पात्रं निभावताना त्यांचं परस्परभिन्नत्व आवाजातील बदल, संवादफेक, त्या- त्या पात्राची देहबोली या सगळ्यांतून त्यांनी प्रत्ययकारीतेनं समूर्त केले आहे. विविध पात्रांच्या वृत्ती-प्रवृत्ती, त्यांच्या तऱ्हा त्यांनी त्यातल्या बारकाव्यांनिशी दाखविल्या आहेत. काही ठिकाणी मात्र नाटय़पूर्णतेच्या आहारी गेल्याने त्यांचा स्वर किंचितसा चढा लागला आहे. तो नियंत्रित ठेवल्यास कथांतर्गत मूड कायम राहील. निवेदकाच्या मनातले भावभावनांचे आंदोळ निलेश पवार यांनी लीलया टिपले आहेत. त्यामुळेच ‘जन्म एक व्याधी’ प्रेक्षकाच्या मनात उदासपण जागवते. तरीही एक वेगळा जीवनानुभव म्हणून तो पाहायलाच हवा.