या शीर्षकातील ‘पण’च खूप महत्त्वाचा आहे. या छायाचित्रातील दोघींना ओळखले का? पुन्हा निरखून पहा . त्या आहेत फराह व नीलम. त्यांची वेगळी ओळख द्यायची तर, फराह ही तब्बूची सख्खी बहिण व दारासिंगचा मुलगा विंदू याची पहिली पत्नी. तर नीलम ही ऐंशीच्या दशकातील गोविंदाची हुकमी नायिका. मागील काळातील काही गोष्टी सांगताना असेच संदर्भ उपयोगी पडतात.

हा चित्रपट आहे, ‘लव्ह 86’ (१९८६). आणि त्यात या दोघींचे प्रियकर आहेत, रोहन कपूर (पार्श्वगायक महेंद्र कपूरचा मुलगा) हा फराहचा हीरो आहे आणि अर्थातच गोविंदा-नीलम ही जोडी आहे. त्या काळातील हा ‘युथफूल चित्रपट’. पण तरीही तो पडद्यावर येईपर्यंत गडबड झाली. काही काही चित्रपटांचे नशीबच मेलं फुटकं (की फुटकळ?) असते. झालं काय तर हे चौघे फ्रेश चेहरे या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येण्यापूर्वीच त्यांचे इतर काही चित्रपट प्रदर्शित झाले. यश चोप्रांचा ‘फासले’ हा रोहन कपूर-फराह जोडीचा पहिलाच चित्रपट रसिकांनी पूर्णपणे नाकारताच त्यांचा ‘लव्ह 86’ मधील रसच संपला. मात्र पहलाज निहलानी यांचा ‘इल्जाम’ सुपर हिट ठरल्याने ‘लव्ह 86’ मधील गोविंदा-नीलम जोडीला पाह्यला यायला काहीच हरकत नव्हती. पण ‘इल्जाम ‘ अॅक्शनपॅक्ड मसाला फिल्म. गोविंदा दे दणादण फायटींग करताना आवडला. त्याला आता प्रेम करताना पाह्यचे? छे, छे काहीतरीच काय?

एकूण काय तर, ‘लव्ह 86’ अगदी तारुण्यसुलभ चित्रपट असूनही तरुण प्रेक्षक त्याकडे वळलेच नाहीत. निर्माता प्राणलाल मेहता व दिग्दर्शक ईस्माईल श्रॉफ यांची फ्रेश चार चेहर्‍याना एकाच चित्रपटातून संधी देण्याची रणनीती फसली. तसा हा चित्रपट फार रंजक वगैरे नव्हता पण या चौघांनी ‘मोहब्बत से हारे’ इत्यादी गाण्यात धमाल मस्ती करीत रंगत आणली. छान टाईमपास होईल इतका व असा मसाला मिक्स चित्रपटात होता. पण चित्रपटाच्या प्रदर्शनाचेच टायमिंग चुकले असेल तर…
दिलीप ठाकूर