रेश्मा राईकवार

काळानुरूप पिढय़ा बदलतात, आजूबाजूच्या परिस्थितीनुसार, त्यांच्या जडणघडणीनुसार त्यांचे विचार बदलतात आणि विचार बदलले की आपोआप जगण्याबद्दलच्या अनेक संकल्पना बदलत जातात. यात प्रेमाची संकल्पनाही बदलणारच. हाच धागा पकडून २००९ साली दिग्दर्शक इम्तियाज अलीने ‘लव्ह आज कल’ चित्रपटातून त्या वेळच्या दोन पिढय़ांमधील प्रेमाची मांडणी केली होती. त्या वेळी त्यातले नायक-नायिका गोंधळलेले होते. आता दहा वर्षांनी पुन्हा त्याच नावाला दुसरा अंक जोडत आत्ताच्या पिढीचे प्रेम आणि त्या वेळी नायक-नायिका असलेल्या पिढीचे प्रेम अशी समांतर मांडणी करत ‘लव्ह आज कल २’ रंगवला आहे. या पिढीच्या मनातली गुंतागुंत पकडताना प्रेमकथेचा दोर किंचितसा सैल पडला आहे, त्यामुळे ज्या प्रभावीपणे त्याच्या कथा मनाची पकड घेतात ती अनुभूती या चित्रपटात तितकी जाणवत नाही.

प्रेमातली गुंतागुंत, प्रत्येक व्यक्तीच्या आत सुरू असलेली गुंतागुंत आणि अशा दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा आजूबाजूच्या परिस्थितीनुसार त्यातली गुंतागुंत एक तर वाढत जाते किंवा हळूहळू सुटत जाते. अशा व्यक्तिरेखांना एकत्र आणत त्यांच्यात तयार होणारे बंध रंगवणे ही दिग्दर्शक म्हणून इम्तियाजची खासियत आहे. तोच धागा याही चित्रपटात दिसतो. आधीच्या चित्रपटात त्या वेळची लव्हकथा मांडताना तरुण पिढीचा प्रेमाविषयीचा गोंधळ त्यात स्पष्ट दिसत होता, त्या तुलनेत या चित्रपटातील नायक आणि नायिका दोघांचाही प्रेमाकडे पाहण्याचा आपापला दृष्टिकोन आहे. त्या अर्थाने ते गोंधळलेले नाहीत, मात्र या पिढीचा गोंधळ वेगळाच आहे आणि काही अंशी त्याला त्यांच्या आधीची पिढी अर्थात त्यांचे आईवडील जबाबदार आहेत, हेही दिग्दर्शक यात दाखवून देतो. प्रेम, नाती, करिअर यात आपली झालेली फसगत, आलेल्या अडचणी आपल्या मुलामुलींना येऊ नयेत, यासाठी आईवडील आधीच तयारीत असतात. त्यामुळे त्यांच्या अनुभवांचा भार घेत, त्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात प्रेमबिम सगळ्याच गोष्टी या चष्म्यातून किंवा आपल्यापेक्षा मोठय़ांनी सांगितलेल्या तथाकथित मापदंडातूनच तपासल्या जातात. त्यामुळे या चित्रपटाची नायिका झोई (सारा अली खान) करिअरवरच लक्ष केंद्रित करणारी, आपले आयुष्य आपल्या पद्धतीने उपभोगणारी असली तरी प्रेमाच्या बाबतीत आईने मांडलेला विचार तिच्यावर गारूड करून जातो. दुसरीकडे नायक वीरच्या (कार्तिक आर्यन) प्रेमाची कल्पनाही त्याच्या आईवडिलांच्याच अनुभवावर आधारलेली आहे. अर्थात, या दोघांचे प्रेम फुलायच्या आत थांबते ते आणखी तिसऱ्याच कथेवरून.. इथे रघु (रणदीप हुडा) त्याच्या महाविद्यालयीन प्रेमाची गोष्ट सांगतो. त्यामुळे रघु-लीना आणि वीर-झोई अशा दोन कथा समांतर सुरू असतात, पण एका वळणावर झोई आणि रघुच्या निमित्ताने त्या एकमेकांत शिरतात. या सगळ्या गुंतागुंतीतून झोई आणि वीरच्या प्रेमाची गोष्ट आकार घेत जाते.

मुळात, एक प्रेमकथा म्हणून हा सरळसाध्या पद्धतीने जाणारा चित्रपट नाही. रूढार्थाने त्यात नाटय़ही नाही, त्याची कारणे बहुधा या पिढीच्या एकंदरीतच बदललेल्या विचारसरणीत असली पाहिजेत. कारण कुठलीही गोष्ट कितीही वाईट अनुभव देणारी ठरली, तरी तो अनुभव मागे टाकून ही पिढी सतत नव्याने पुढे जात राहते. त्यामुळे प्रेमभंगाचे दु:ख कुरवाळत बसणेही या पिढीला मान्य नाही, की एखाद्या व्यक्तीसाठी संपूर्ण आयुष्यही थांबवणे त्यांना गरजेचे वाटत नाही. सगळे काही चोख असायला हवे, आयुष्य परफेक्टच घडायला हवे, या आग्रहातून अगदी प्रेम, माया, संवाद अशा कित्येक गोष्टी त्यांच्या हातून सुटत जातात. जगायचे आहेच्या नादात जगणे राहून जाते, ही जाणीव नेणिवेत उतरणे हे या पिढीसमोरचे खरे आव्हान आहे. त्यामुळे इथे प्रेम शोधतानाही ते त्याच पद्धतीने आतून आले पाहिजे, हा वीरचा आग्रह खोटा वाटत नाही. नात्यांच्या संकल्पना ज्या वेगाने बदलत चालल्या आहेत, त्यावर दिग्दर्शक नेमकेपणाने बोट ठेवतो आणि तरीही ही इम्तियाज अलीची प्रेमकथा म्हणून मनाचा ठाव घेत नाही. ती आवडून जाते, त्यातले संदर्भ, त्यातले प्रेम प्रेक्षकांपर्यंत पोहोचते, मात्र या वेळी मांडणीतील गुंतागुंत दिग्दर्शकाने वाढवली आहे आणि दोन कथा मांडण्याच्या नादात रघु आणि लीनाची प्रेमकथा काहीशी अर्धवट अशी आपल्यासमोर येते. त्यामुळे की काय या चित्रपटाचा एकसंध प्रभाव जाणवत नाही. दिग्दर्शक म्हणून इम्तियाजने कायम नवनवीन कलाकारांच्या जोडय़ांबरोबर काम केले आहे. इथेही कार्तिक आर्यन आणि सारा अली खान ही जोडी आपल्यासमोर येते.

साराची व्यक्तिरेखा लेखक-दिग्दर्शकाने कागदावर उत्तम उतरवली आहे, किंबहुना हा चित्रपट झोईच्या खांद्यावर पेलून धरला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या व्यक्तिरेखेनुसार झोई म्हणून सारा या भूमिकेत चपखल बसली आहे. अनेकदा तिला पाहताना तिच्या आईची अभिनेत्री अमृता सिंगची छाप जाणवत राहते. त्या तुलनेत दोन-दोन नायकांच्या भूमिकेत असूनही कार्तिकला पुरेशी छाप पाडता आलेली नाही. कार्तिकपेक्षा रणदीप हुडाची व्यक्तिरेखा जास्त भाव खाऊन गेली आहे. प्रेकमथा म्हटल्यावर त्याला श्रवणीय गीतांची जोड असायलाच हवी. इथे गीतकार म्हणून इर्शाद कामिल आणि संगीतकार म्हणून प्रीतम अशी जोडी असतानाही हे समीकरण फार श्रवणीय झालेले नाही. त्यातल्या त्यात ‘शायद कभी मैं कह सकू’ हे गाणे जमून आले आहे. इम्तियाज अलीच्या आधीच्या प्रेमकथा आठवल्या तर यात तो बाज अजिबातच टिकवता आलेला नाही, मात्र या पिढीची अचूक नाळ त्याने पकडली आहे, हे मात्र आवर्जून सांगायला हवे.

लव्ह आज कल २

दिग्दर्शक – इम्तियाज अली

कलाकार – कार्तिक आर्यन, सारा अली खान, रणदीप हुडा आणि आरूषी शर्मा.