मराठी चित्रपटसृष्टीतून अभिनयाची सुरुवात करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर गेल्या काही काळापासून सतत बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकताना दिसून येत आहे. ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’, ‘गजनी’ आणि ‘हंटर’ या चित्रपटांमध्ये झळकलेली सई पुन्हा ‘लव सोनिया’ या नव्या बॉलिवूड चित्रपटामध्ये झळकणार आहे. या निमित्ताने तिने तिचे अनुभव शेअर केले आहेत.

तबरेज नुरानी दिग्दर्शित ‘लव सोनिया’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यामध्ये सई अंजली नावाच्या देहविक्रय व्यवसाय करणाऱ्या महिलेची भूमिका पार पाडणार आहे. विशेष म्हणजे ही भूमिका करत असताना अनेक वेळा तिला मानसिक ताणाला सामोरं जावं लागल्याचं तिने म्हटलं आहे.

‘या चित्रपटामुळे देहविक्रयाच्या व्यवसायातल्या बायकांच्या व्यथा मला ख-या अर्थाने कळल्या. इथे पकडून आणलेल्या लहानमुलांना कसं गुलाम बनवलं जाते, ते कळले. त्यांना छोट्या पिंज-यात दोन-दोन दिवस अन्न-पाण्याविना बंद करून ठेवतात. हे सारं पाहून मला प्रचंड मानसिक त्रास होत होता. मला हे सहन होत नव्हतं. मला अनेक मानसिक वेदनांना सामोरं जावं लागत होतं, त्यामुळे अंजली साकारणं माझ्यासाठी प्रचंड अवघड होतं’, असं सई म्हणाली.

पुढे ती असंही म्हणाली, ‘या चित्रपटामध्ये अंजली देहविक्रय करण्यासाठी मुली पुरविण्याचं काम करते. त्यामुळे तिच्या आजूबाजूचं वातावरणही त्याप्रमाणेच आहे. ती सतत नकारात्मक वातावरणामध्ये वावरत असल्यामुळे माझ्यावरही कळत-नकळत हा परिणाम होऊ लागला होता. त्यामुळे मला ही भूमिका रंगतवाताना खूप फ्रस्टेशन यायचे. माणसं एवढी कशी वाईट असू शकतात? मी एखाद्या व्यक्तिशी किती वाईट वागतेय? असं वाटायच.’