सर्वाधिक गाणी लिहिल्याबद्दल हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गीतकार समीर यांचे नाव आतागिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेले आहे. चित्रपट रसिक व श्रोत्यांवर आपल्या शब्दांनी गारूड करणाऱ्या समीर यांनी ३५ वर्षांच्या कारकिर्दीत शंभरहून अधिक संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. गीतकार समीर यांची अनेक गाणी लोकप्रिय असून चाहा है तुझकोअसे त्यांच्या चाहत्यांना समीर यांच्याबद्दल वाटते. समीर यांनी आजवर ६१७ चित्रपटांसाठी ३ हजार ४०० गाणी लिहिली आहेत. येत्या १३ फेब्रुवारी रोजी मुंबईत एका कार्यक्रमात याबाबतची घोषणा केली जाणार आहे. त्या निमित्ताने.. 

एखादे गाणे लोकप्रिय होण्याचे श्रेय त्या गाण्याचे गीतकार, गायक की संगीतकार यांचे असते हा वाद जुना आहे. मात्र चित्रपट हे जसे ‘टीमवर्क’ आहे, त्याचप्रमाणे जमून आलेल्या गाण्याची भट्टी हे ही ‘टीमवर्क’ असून त्या गाण्याच्या लोकप्रियतेमध्ये गीतकार, संगीतकार आणि गायक या प्रत्येकाचेच महत्त्वाचे योगदान आहे. कोणत्याही प्रादेशिक भाषेतील चित्रपटातील गाण्यांच्या तुलनेत हिंदी चित्रपटातील गाण्यांना जास्त प्रसिद्धी मिळते. ती गाणी या ना त्या स्वरूपात लोकांच्या कानावर आदळत असतात. पूर्वीच्या तुलनेत गाणी प्रेक्षक व श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी माध्यमांची संख्याही वाढलेली आहे. या सगळ्याचा फायदा हिंदी गाण्यांना मिळतो. हिंदी चित्रपटसृष्टीला गीतकारांची मोठी परंपरा आहे. या गीतकारांनी हिंदी चित्रपटसृष्टी आणि आपल्या सगळ्यांचेच जगणे समृद्ध  केले आहे. जीवनातील सुखदु:खाच्या क्षणी ही गाणी आपल्याला मानसिक आणि भावनिक आधार देत असतात.

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक प्रतिभावंत गीतकारांनी आपल्या गाण्यांनी रसिकांना व श्रोत्यांना निखळ आनंद दिला आहे. या गीतकारांच्या परंपरेतील एक नाव गीतकार समीर हे आहे. ‘मास’ ते ‘क्लास’ अशा वर्गासाठी समीर यांनी गीतलेखन केले असून सर्वाधिक गाणी लिहिणारे गीतकार म्हणून त्यांच्या नावाची नोंद अलीकडेच ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली आहे. गीतकार आनंद बक्षी यांनी ६२४ चित्रपटांसाठी ३ हजार २०० गाणी लिहिली तर समीर यांनी ६१७ चित्रपटांसाठी ३ हजार ४०० गाणी लिहिली. समीर यांनी हिंदीसह भोजपुरी आणि मराठी चित्रपटासाठीही काही गाणी लिहिली आहेत. बॅंक अधिकारी म्हणून करिअरची सुरुवात केलेल्या समीर यांची कहाणी संघर्षांची आहे.

बॉलिवूडमध्ये करिअर करायचे या उद्देशाने त्यांनी बँकेतील सुरक्षित नोकरी सोडली आणि या बेभरवशाच्या क्षेत्रात पाऊल टाकले. सुरुवातीला त्यांनी ‘बेखबर’, ‘इन्साफ कौन करेगा’, ‘जबाब हम देंगे’, ‘रखवाला’, ‘महासंग्राम’ आदी चित्रपटांसाठी गाणी लिहिली. या गाण्यांमुळे त्यांना यश व प्रसिद्धी मिळाली नाही. सातत्याने संघर्ष केल्यानंतर अखेर १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी’ चित्रपटातील गाण्यांनी समीर यांना प्रसिद्धी मिळवून दिली. ‘सांसो की जरुरत है जैसे’, ‘मै दुनिया भूला दुंगा’, ‘नजर के सामने जिगर के पास’ ही गाणी प्रचंड लोकप्रिय झाली आणि समीर यांनी मागे वळून पाहिले नाही. सर्वसामान्य रिक्षा-टॅक्सी चालकांपासून ते अगदी कॉर्पोरेट ऑफिसमधील मोठय़ा पदांवरील व्यक्तींपर्यंत तसेच तरुण-तरुणी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनीना ‘आशिकी’च्या गाण्यांनी अक्षरश: वेड लावले. समीर यांनी आजवर ३५ संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. नदीम-श्रवण, राजेश रोशन, इलया राजा, जतीन ललित, दिलीप सेन-समीर सेन, अन्नू मलिक, आदेश श्रीवास्तव, ए. आर. रहेमान, शंकर एहसान-लॉय आदी संगीतकारांबरोबर समीर यांची जोडी जमली.

‘दिवाना’, ‘हम है राही प्यार के’, ‘बेटा’, साजन’, ‘राजाबाबू’,  ‘सडक’, ‘जुर्म’, ‘बोल राधा बोल’, ‘ऑखे’, ‘शोला और शबनम’, ‘कुली नंबर वन’, ‘हिरो नंबर वन’, ‘दिल है की मानता नही’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘फिजा’, ‘धडकन’, ‘कुछ कुछ होता है’, कभी खुशी कभी गम’, ‘देवदास’, ‘तेरे नाम’, ‘धूम’, ‘सावरिया’, ‘रावडी राठोड’, ‘दबंग-२’ या आणि अन्य अनेक चित्रपटांसाठी समीर यांनी लिहिलेली गाणी लोकप्रिय झाली आहेत. अभिनेता गोविंदावर चित्रित झालेली व समीर यांनी लिहिलेली अनेक गाणी लोकप्रिय झाली आहेत. सवरेत्कृष्ट गीतकार म्हणून समीर यांना ‘स्क्रीन’ पुरस्कारासह अन्य अनेक पुरस्कार विविध गाण्यांसाठी मिळाले आहेत. समीर यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांच्या आणि श्रोत्यांच्या मनावर केलेले गारूड हिंदी चित्रपट संगीत असेपर्यंत कायम राहणार आहे.

समीर यांची गाजलेली गाणी

  • तुम्हे अपना बनाने की कसम खाई है
  • मुझे नींद न आए, मुझे चैन न आए न
  • दिल है के मानता नही
  • मुश्कील बडी है रस्म ए मोहब्बत
  • पहेली नजर में
  • आपके प्यार मे हम
  • चाहा है तुझको
  • आखों ने तुम्हारी
  • जो हाल दिल का
  • आए हो मेरी जिंदगी में
  • मैने प्यार तुम्हीसे
  • घुंगट की आड से
  • परदेसी परदेसी जाना नही
  • धूम मचा ले धूम
  • धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना
  • तेरी उम्मीद तेरा इंतजार