आपल्या अदांनी, सौंदर्याने आणि नृत्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. धकधक गर्ल, डान्सिंग क्वीन अशा अनेक नावांनी तिचा कायम उल्लेख केला जातो. सौंदर्य आणि मनमोहक हास्यामुळे अनेकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्रीची बहिणीदेखील तिच्या इतकीच सुंदर आहे. अलिकडेच माधुरीने सोशल मीडियावर तिच्या जुन्या आठवणी शेअर केल्याचं पाहायला मिळालं. यात तिने तिच्या बहिणीसोबतचा एक फोटो शेअर केला.

माधुरी सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याच वेळा ती फोटो, व्हिडीओजच्या माध्यमातून तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. यात तिच्या कुटुंबीयांचे फोटो, तिच्या डान्सचे व्हिडीओ यांचाही समावेश असतो. त्यामुळे तिच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी चाहत्यांना माहित आहे. मात्र माधुरीच्या बहिणीविषयी फार कमी जणांना माहित आहे. त्यातच तिने बहिणीसोबतचा एक फोटो शेअर केल्यामुळे तिच्या बहिणीबद्दल जाणून घेण्यास चाहते उत्सुक असल्याचं दिसून येतं.

माधुरीने एक थ्रोबॅक फोटो शेअर केला असून यात ती आणि तिची बहिणी डान्स करताना दिसत आहेत. हा फोटो माधुरीच्या लहानपणीचा आहे. विशेष म्हणजे माधुरीची बहिणी हुबेहूब तिच्यासारखी दिसत असून त्यांची हेअर स्टाइलदेखील सारखीच असल्याचं पाहायला मिळत आहे. माझ्या बहिणीसोबत अनेक आठवणी आहेत. मात्र ही सगळ्यात आवडती आठवण आहे. आम्ही शाळेतील प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायचो. माझ्या सगळ्यात आवडत्या सोबतीसह मी हा फोटो शेअर करत आहे. तुमच्या लहानपणातील तुम्हाला लक्षात राहिलेली, आवडती आठवण कोणती? सांगू शकता का?, असं कॅप्शन माधुरीने या फोटोला दिलं आहे.

दरम्यान, माधुरी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिची लोकप्रियता सातासमुद्रापार आहे. ९० च्या दशकात सुपरहिट चित्रपट करणारी माधुरी सध्या विविध कारणांमुळे चर्चेत येत आहे. विशेष म्हणजे मोठा पडदा गाजवल्यानंतर माधुरी आता वेबविश्वात पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे.