प्रेमकथेवर आधारित ‘आशिकी’ या १९९० सालच्या चित्रपटाने त्यावेळच्या तरुणाईवर चांगलीच भुरळ घारली होती. चित्रपटातील सुमधूर गाण्यांची जादू आजही कायम आहे. ‘आशिकी’ची पोस्टर्स तर चर्चेचा विषय होती. वेगळ्या धाटणीची केशरचना असलेला राहुल रॉय आणि सावळ्या रंगाची अनु अग्रवाल या जोडीचा हा पहिलाच चित्रपट. दोघांनीही आपल्या पहिल्याच चित्रपटातून चाहत्यांच्या हृदयात जागा मिळवली. परंतु त्यांचा हा करिश्मा पुढच्या काळात दिसून आला नाही. कालौघात त्यांची नावेदेखील विस्मरणात गेली. यातील राहुल रॉय अधुनमधून चर्चेत असतो, परंतु, अनु अग्रवाल तशी फारशी चर्चेत नव्हती. ‘आशिकी’मधील या सावळ्या रंगाच्या सुंदरीने आपल्या जीवन प्रवासातील चांगले आणि कटू अनुभव कथन करणारे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला ‘आशिकी’चे दिग्दर्शक महेश भट उपस्थित होते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी भरलेला जीवनप्रवास शब्दरुपात मांडण्याच्या तिच्या धाडसी प्रयत्नांचे महेश भट यांनी यावेळी बोलताना कौतुक केले. “आयुष्यात तिने जे काही सोसलं आहे ते पुस्तक रुपाने लोकांसमोर माडण्याच्या तिच्या धाडसाला माझा सलाम. आजच्या आयुष्यात तू जे काही करते आहेस ते समाधानकारक असल्याचं मला वाटतं. त्याचप्रमाणे, माझ्या जीवनात आलेल्या या अनोख्या मुलीविषयी बोलण्याची संधी मिळाली, हा माझा सन्मान समजतो. ‘आशिकी’ चित्रपटाद्वारे आम्ही एकत्र आलो. या चित्रपटाने देशातील चित्रपटरसिकांच्या हृदयातील एक कोपरा आजही व्यापला आहे.” असं महेश भट यावेळी म्हणाले.
‘रिटर्न ऑफ ज्वेल थिफ’ चित्रपटानंतर अनु प्रसिध्दी झोतातून अचानक गायब झाली. दरम्यानच्या काळात ती जगभरात अनेक ठिकाणी फिरली. तसेच तिने योगविद्या आणि आत्मसाधनेवर भर दिला. १९९९ साली मोठा अपघात झाल्यानंतर अनु २९ दिवस कोमात होती. अपघातातून बरे होण्यासाठी तिला फार कष्ट घ्यावे लागले. हा कष्टप्राय प्रवास तिने पुस्तकात कथन केला आहे.
अनुच्या पुस्तक अनावरणानिमित्ताने ‘आशिकी’ची सर्व टीम एकत्र आली होती. ज्यात राहुल रॉय आणि दिपक तिजोरी यांचादेखील समावेश होता.