काही चित्रपट जरी जुने झाले तरी त्यातील गाणी आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. असाच एक चित्रपट म्हणजे १९९० साली प्रदर्शित झालेला ‘आशिकी’. गाण्यांमुळे हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर तुफान हिट ठरला. पण तुम्हाला माहीत आहे का, की या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश भट्ट यांनी प्रदर्शनापूर्वी कागदावर लिहून दिलं होतं की, ‘मी दिग्दर्शन क्षेत्रच सोडून देईन.’ यामागची कहाणीही तितकीच रंजक आहे.

‘द कपिल शर्मा शो’मध्ये गीतकार समीर यांनी हा किस्सा सांगितला. समीर यांनीच ‘आशिकी’ चित्रपटातील गाणी लिहिली होती. त्यावेळी समीर हे गायिका अनुराधा पौडवाल यांच्यासोबत एका गाण्यावर काम करत होते. अनुराधा यांनीच समीर यांची भेट ‘टी सीरिज’चे गुलशन कुमार यांच्याशी करून दिली होती. त्यावेळी गुलशन कुमार समीर यांना म्हणाले, ‘मी कोणता चित्रपट तर सध्या करत नाहीये, पण माझ्या म्युझिक बँकसाठी तुम्ही गाणी रेकॉर्ड करून ठेवू शकता. त्यानंतर जर मला ती गाणी आवडली तर मी एखाद्या निर्मात्याला ते नक्की ऐकवेन.’

संगीत दिग्दर्शक नदीम श्रवण यांच्यासोबत मिळून समीर यांनी गाणी रेकॉर्ड केली. त्यावेळी दिग्दर्शक महेश भट्ट यांना ती गाणी प्रचंड आवडली होती. गाणी ऐकून त्यांना चित्रपटाची कथा लिहावीशी वाटली. महेश भट्ट यांनी ‘आशिकी’ हा चित्रपट बनवला आणि त्यात ती गाणी वापरली.

त्यानंतर एकदा गुलशन कुमार यांचा समीर यांना फोन आला. फोनवर ते म्हणाले, ‘सगळे म्हणतायत की ही गाणी कोणत्या चित्रपटाची नाही तर अल्बमची वाटतात. मी याचा म्युझिक अल्बम लाँच करतो.’ हे ऐकताच समीर घाबरले आणि त्यांनी नदीम यांना फोन केला. नदीम आणि समीर मिळून महेश भट्ट यांच्याकडे गेले. नंतर या दोघांना घेऊन महेश भट्ट गुलशन कुमार यांच्याकडे गेले. भट्ट यांनी गुलशन कुमार यांना म्युझिक अल्बम लाँच करण्यामागचं कारण विचारलं. त्यावर ते म्हणाले की ही गाणी कोणत्या चित्रपटासाठी योग्य नाही वाटत. तेव्हा महेश भट्ट यांनी गुलशन कुमार यांना कागदावर लिहून दिलं होतं, ‘जर हा चित्रपट आणि त्यातील गाणी यांनी संगीत विश्वात विक्रम रचला नाही तर मी दिग्दर्शन हे क्षेत्रच सोडून देईन.’

अशा प्रकारे राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांची मुख्य भूमिका असलेला ‘आशिकी’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर तुफान गाजला आणि त्यातील गाणी आजही प्रेक्षकांच्या तोंडी आहेत.