बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे १४ जून रोजी निधन झाले. त्याने वयाच्या ३४व्या वर्षी जगाचा निरोप घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर पवित्र रिश्ता मालिकेत सुशांतसोबत काम केलेल्या पराग त्यागीने सुशांतच्या निधाने धक्का बसल्याचे सांगितले. तसेच त्याने सुशांतचा को-स्टार आणि जवळचा मित्र महेश शेट्टीला फोन केला. त्यावेळी महेश बोलायचाही मनस्थितीमध्ये नसल्याचे त्याने सांगितले.

परागने नुकताच यासंदर्भात पिंकव्हिलाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने, ‘जेव्हा मी महेशला फोन केला त्यावेळी तो बोलायचाही मनस्थितीमध्ये नव्हता. त्याला धक्काच बसला. त्याने नंतर कॉल करतो असे बोलून फोन ठेवला. सध्या तो खूप कठिण परिस्थितीमधून जात आहे’ असे म्हटले आहे.

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी सकाळी ९.३०च्या आसपास त्याच्या बहिणीला फोन केला होता. त्यानंतर त्याने त्याचा मित्र महेश शेट्टीला फोन केला होता. पण महेशने फोन उचलला नाही आणि थोड्या वेळातच सुशांतने आत्महत्या केल्याचे समोर आले.

त्यानंतर महेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने सुशांतच्या अचानक जाण्याने मला धक्काच बसला आहे. मी माझ्या भावाला गमावले आहे. मी अजूनही या धक्क्यातून स्वत:ला सावरु शकलेलो नाही असे म्हटले आहे.

सुशांतने छोट्या पडद्यावरील मालिकेमध्ये काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्याने किस देस में है मेरा दिल या मालिकेत काम केले. त्यानंतर ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत काम केले. २०१३मध्ये त्याने ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या.