News Flash

‘म्हशीचं हंबरणं चालेल पण हे गाणं नको’; अमृता फडणवीसांच्या गाण्यावर महेश टिळेकरांची टीका

अमृता फडणवीस यांचं नवं गाणं ऐकून महेश टिळेकर संतापले

विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं एक नवं गाणं रसिकांच्या भेटीस आलं आहे. भाऊबीजेच्या निमित्ताने त्यांनी हे गाणं गायलं आहे. त्यांनी हे गाणं राज्यातील प्रत्येक भाऊरायाला समर्पित केलं आहे. या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हे गाणं पाहून काही नेटकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त करत अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली. या टीकाकारांमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता महेश टिळेकर देखील आहेत. “गायी म्हशीच्या हंबरण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण हा आवाज सहन होत नाही”, असं म्हणत त्यांनी अमृत फडणवीस यांना खरंच गाता येतं का? सवाल केला आहे.

महेश टिळेकर हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ते रोखठोकपणे आपली भूमिका मांडतात. यावेळी त्यांनी अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर निशाणा साधला आहे. “चांगला आवाज असूनही केवळ नाव नाही हाती भरपूर पैसा नाही म्हणून नवीन गायकांना कुणी मदतीचा हात देऊन संधी देणारा पाठीशी उभा राहत नाही. सुमधुर आवाज असलेल्या महाराष्ट्रातील अनेक नवीन गायकांना साधी कुठं संधी मिळत नाही पण जिचा आवाज ऐकला की कानाचे पडदे फाटण्याची भीती निर्माण होते ,लाखो तरुणांच्या ह्रदयात धडकी भरते आणि गाणं हे दुसऱ्याला आनंद देण्याऐवजी दुःख देण्यासाठीच गायले जाते असा समजच होण्याची शक्यता निर्माण होते अशी एक आपल्याच विश्वात धुंद होऊन गाणारी विश्र्वगायिका लोकांना सातत्याने का छळत आहे? गायी म्हशीच्या हंबरडण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण या गायिकेचा आवाज ऐकून तिच्या आवाजाला अनेकांनी शब्दरुपी श्रद्धांजली वाहिली तरीही ही स्वयंघोषित गायिका मी पुन्हा गाईन मी पुन्हा गाईन म्हणत आपल्या गळ्याचा व्यायाम थांबवायचे नाव घेत नाही. आपल्याकडे जुनी म्हण आहे ” आडात नसेल तर पोहऱ्यात येणार कुठून? केवळ ह्या अश्या गायिकेला प्रोमोट करण्यासाठी तिला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्यासाठी टी सिरीज सारखी ,नेहमीच बिझिनेसला प्राधान्य देणारी कंपनी का पैसा खर्च करत आहे,?त्यामागे काय लागेबांधे आहेत ? हे एक न सुटणारे कोडे आणि जर ह्या गायिके कडे स्वतःचा अतिरिक्त खूपच पैसा असेल तर तिने एखादं संगीत विद्यालय सुरू करून नवोदित गायकांना चांगल्या संगीत शिक्षकांचे मार्गदर्शन होईल यासाठी स्वतः न गाता फक्त संगीत सेवा करावी.

पण काहीही म्हणा लता मंगेशकर यांनी गायलेल्या ” आज अमृताचा घनु..या ओळीतील अमृता हा शब्द लता दीदींच्या मुखातून ऐकायला आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवितून वाचायलाच योग्य वाटतो.इतरांनी फक्त त्या अमृता नावाची किमान लाज राहील याचा तरी प्रयत्न करावा.” अशा शब्दात त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अमृता फडणवीस यांनी त्यांचं नवं गाणं स्त्रियांना समर्पित केलं आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देताना त्यांनी स्त्री शक्तीचं महत्व पटवून दिलं आहे. या गाण्याच्या व्हिडीओत अमृता फडणवीस यांनी त्यांचा आणि त्यांच्या मुलीचाही फोटो वापरला आहे. तसंच स्त्रिया या कशाप्रकारे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत आहेत ते दाखवून दिलं आहे. स्त्री भ्रूण हत्या होतात, स्त्रियांना नाकारलं जातं, त्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवलं जातं, त्यांच्यावर अत्याचार होतात हे सगळं टाळण्याचं आवाहन अमृता फडणवीस यांनी त्यांच्या नव्या गाण्यातून केलं आहे. समाज जागृतीच्या दृष्टीने त्यांनी त्यांचं नवं गाणं समोर आणलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 11:48 am

Web Title: mahesh tillekar amruta fadnavis news song mppg 94
Next Stories
1 Video : “सोशल मीडियावर असं बोलू नको”, बॉयफ्रेंड विकी जैनवर ओरडली अंकिता लोखंडे
2 ‘भाई, बिना शर्ट के विंटर?’; सलमानच्या शर्टलेस फोटोवर चाहत्यांची मस्करी
3 पुढच्या वर्षी होणार मिसेस… सोनाली कुलकर्णीची खास पोस्ट
Just Now!
X