‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून लोकप्रियता मिळालेल्या अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा सध्या खूप चर्चेत आहे. तिचा मुलगा अभिमन्यू दासानी याने नुकतंच सिनेसृष्ट्रीत पदार्पण केलं असून त्याच्या पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘मर्द को दर्द नहीं होता’ असं या चित्रपटाचं नाव आहे.

‘मर्द को दर्द नहीं होता’ म्हणजेच कुठल्याही शारीरिक वेदना न होणाऱ्या पुरुषाची ही कथा आहे. कितीही मार लागला तरी त्याला कोणत्याच वेदना जाणवत नसल्याचं या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे. त्याचबरोबर काही जबरदस्त अॅक्शन सीनसुद्धा यामध्ये पाहायला मिळतात.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री राधिका मदान यामध्ये अभिमन्यूसोबत सहकलाकार आहे. चित्रपटात हे दोघे लहानपणापासूनचे मित्र असतात. या चित्रपटाचे दिग्दर्शन वासन बाला यांनी केले आहे. तर अनुराग कश्यपच्या ‘फॅण्टम फिल्म्स’ने चित्रपटाची निर्मिती केली आहे. याबाबत अनुराग कश्यप म्हणाला होता की, ‘वासन यांनी मार्शल आर्ट्सला केंद्रस्थानी ठेवत या चित्रपटाची कथा लिहिली आहे. ही एक अनोखी कथा असून अशा प्रकारच्या चित्रपटाची निर्मिती करायला मिळत असल्याने मी खूश आहे.’