“गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं” असं म्हणत जवळपास तीन वर्षांपूर्वी सुरु झालेली ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका प्रेक्षकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. या मालिकेतील राधिका ही व्यक्तिरेखा तमाम प्रेक्षकांच्या घरातील एक सदस्य बनली आहे. या व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. लॉकडाऊनमुळे मालिकेचे नवीन भाग प्रसारित होत नाही आहेत. राधिका म्हणजेच अभिनेत्री अनिता दाते ही लॉकडाऊनमध्ये कसा वेळ घालवतेय हे जाणून घेण्यासाठी तिच्यासोबत साधलेला हा खास संवाद..
१. तू लॉकडाउनमध्ये घरी वेळ कसा घालवतेय?
– घरातली कामं करण्यातच अर्धा दिवस निघून जातो. एरव्ही शूटिंगमुळे अनेक गोष्टी करायची इच्छा असूनही करता येत नव्हत्या. सध्या सकाळच्या चहा पासून ते घर स्वच्छ ठेवण्यापर्यंत सगळी कामं करतेय. त्यातून जो वेळ उरतो त्यात वाचन, वेब सीरीज, पाहायची राहून गेलेली नाटकं-चित्रपट बघणं सुरु आहे. प्रत्येक दिवशी काय बघायचं आहे, याचं मी प्लॅनिंग करून ठेवलंय.
२. मालिकेची आठवण येते का?
– हो ना, राधिकाची प्रचंड आठवण येत आहे. माझ्या भूमिकेबरोबरच मालिकेच्या संपूर्ण टीमची खूप आठवण येते. आम्हा सर्वांचा व्हॉट्स अॅपवर ग्रुप आहे. आम्ही त्यावर गप्पा मारतो. कधीकधी व्हिडीओ कॉल करतो. या मालिकेने मला जीवाला जीव देणारे मित्र-मैत्रिणी दिले आहेत.
३. मालिकेत तुझा वऱ्हाडी भाषेचा असलेला ठसका, घरी देखील असतो का?
– सुरुवातीचे काही दिवस घरातही वऱ्हाडी भाषा बोलण्यात आपोआपच यायची. पण नंतर हळूहळू मालिकेतला या भाषेचा वापर कमी झाला. पण विदर्भातील एखादा चाहता किंवा स्वतःहून माझ्याशी कोणी वऱ्हाडी भाषेत संवाद साधला तर मी पण त्यांच्याशी त्या भाषेतच बोलते.
४. तू प्रेक्षक आणि चाहत्यांना काय सांगशील?
– सध्याच्या परिस्थितीत मला एकच सांगायचंय की घरी थांबा, संयम ठेवा. आपल्या सुरक्षेसाठी जे बाहेर लढत आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवा. पोलीस, डॉक्टर, सरकारी कर्मचारी यांना त्यांचं काम करू द्या. आपल्याकडून त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊया.