04 March 2021

News Flash

‘यू आर माय तारा..’

मालविकाचे वडील के. यू. मोहनन हे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आहेत. त्यामुळे चित्रपटाचं जग तिने जवळून बघितलं आहे.

प्रसिद्ध इराणी चित्रपट दिग्दर्शक माजिद मजिदी हिंदीत पहिल्यांदाच चित्रपट करतायेत अशी वार्ता जेव्हा वाऱ्याच्या वेगाने पसरली तेव्हा या चित्रपटात कोणते भारतीय कलाकार असणार याबद्दल चर्चा सुरू झाली. त्यानंतर चक्क दीपिका पदुकोणने धोबीघाट परिसरात खास या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी चित्रीकरण केले हेही लोकांपर्यंत पोहोचले. ‘बियाँड द क्लाऊड्स’नामक या चित्रपटात तोवर शाहिद कपूरचा भाऊ इशान खत्तार याची मुख्य भूमिकेत वर्णी लागली होती. मात्र दुसऱ्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी नायिकेचा चेहरा सापडत नव्हता. दीपकाचे ‘स्टार’ वलय या भूमिकेआड येत होते. अखेर, तीन मल्याळम चित्रपट गाठीशी असलेल्या मालविका मोहनन हिची ऑडिशन झाली आणि तिच्याकडे पाहताच ‘यु आर माय तारा..’ म्हणत मजिदींनी तिच्यावर शिक्कामोर्तब केले. मालविका मोहनन ही नवोदित अभिनेत्री या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करतेय, पण तिच्यासाठी हे ग्लॅमरचं जग नवं नाही हेही तिने ‘रविवार वृत्तांत’शी बोलताना स्पष्ट केलं.

मालविकाचे वडील के. यू. मोहनन हे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आहेत. त्यामुळे चित्रपटाचं जग तिने जवळून बघितलं आहे. मी लहानपणापासून हे ग्लॅमर विश्व अनुभवलं आहे, पण मला त्याचं वेड कधीच नव्हतं. मी एकीक डे बीएमएम जाहिरात विषयात करत होते, मला काय करायचं आहे याविषयी चाचपणी सुरू होती. तेव्हा माझी छायाचित्रे प्रसिद्ध मल्याळम अभिनेता माम्मूटी यांनी बघितली आणि त्यांच्याकडून मला पहिल्या चित्रपटाची ऑफर मिळाली. त्यांचा मुलगा डुलकेर सलमान जो आज प्रसिद्ध अभिनेता आहे त्याच्याबरोबर मी पहिला चित्रपट केला. त्यानंतर आणखी दोन मल्याळम चित्रपट केले. त्यामुळे लोक मला दाक्षिणात्य अभिनेत्री म्हणतात, पण तसे अजिबात नाही. मी दाक्षिणात्य असले तरी माझा जन्म-शिक्षण सगळं इथे मुंबईतच झालं असल्याने मी पूर्णपणे इथली आहे, असं ती स्पष्ट करते.

मालविकाने बॉलीवूडमध्ये येण्यासाठी माजिद मजिदींचा चित्रपट का निवडला याबद्दल बोलताना तिने मला हिंदी चित्रपटांसाठी ऑफर्स येत होत्या, मात्र आपला पहिला चित्रपट हा नेहमी महत्त्वाचा असतो, असं मला वाटतं. त्यामुळे मी चांगल्या भूमिकेच्या शोधात होते आणि योगायोगाने मला माजिद मजिदींचा हा चित्रपट मिळाला. याशिवाय, तुमच्या कारकीर्दीसाठी योग्य सुरुवात असूच शकत नाही, असं ती म्हणते. आपल्याला कधी माजिद मजिदींच्या चित्रपटात काम करायला मिळेल, असा विचार स्वप्नातही येण्याची शक्यता नाही, असं ती म्हणते. ज्या दिग्दर्शकाने आपल्या इराणी चित्रपटांमधून जगभरातील चाहत्यांवर गारूड केलं आहे तो दिग्दर्शक कधी तरी भारतात येऊन चित्रपट दिग्दर्शन करेल, असा विचारच कोणी केला नव्हता. त्यामुळे मला जेव्हा त्यांच्या चित्रपटात काम करायला मिळते आहे हे लक्षात आले तेव्हा मला खूप आनंद झाला होता, असं सांगणाऱ्या मालविकाने चित्रपटप्रेमी म्हणून आपण माजिद मजिदींचे सगळे चित्रपट आधी पाहिले होते, काही अभ्यासले होते, असेही स्पष्ट के ले.

‘‘माझ्या वडिलांमुळे आमच्या घरी आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या सीडीज कायम यायच्या. मी लहानपणापासून हे चित्रपट पाहिले आहेत. आपल्याकडे अजूनही चित्रपटसृष्टीच्या मुख्य प्रवाहातील असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी मजिदींचे चित्रपट पाहिलेले नाहीत. माझं तसं नव्हतं. माजिद मजिदी हा काय किमयागार आहे याची कल्पना मला होती, आहे. त्यामुळेच हा चित्रपट मला महत्त्वाचा वाटतो,’’ असं ती म्हणते. ‘बियाँड द क्लाऊड्स’ या चित्रपटात मालविका तारा नावाची व्यक्तिरेखा साकारते आहे. मुळात हा चित्रपट भावा-बहिणीच्या कथेवर आधारित आहे. इशान खत्तार तिच्या भावाच्या भूमिकेत या चित्रपटात दिसणार आहे. मजिदींसारखा मानवी भावभावना अतिशय तरलतेने पडद्यावर रंगवणाऱ्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात काम करताना तिला दडपण वाटले होते का, असं विचारताच दडपण होतंच, पण ते वेगवेगळ्या कारणांसाठी होतं, असं सांगते. या चित्रपटासाठी इशानची निवड पहिल्यांदा झाली होती. त्यानंतर दीपिकाची ऑडिशन झाली. मात्र दीपिकाचा चेहरा प्रसिद्ध असल्याने मजिदींना ती या भूमिकेसाठी योग्य वाटत नव्हती. या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीत आपली निवड झाली तेव्हा चित्रीकरण सुरू व्हायला फक्त एकच आठवडा होता, अशी माहिती मालविकाने दिली.

‘‘माझ्याकडे फक्त आठवडा होता. त्यात मला ताराची व्यक्तिरेखा शोधायची होती. मजिदींच्या दिग्दर्शनाची शैलीही माहिती नव्हती; पण पुन्हा इथे श्रेय त्यांच्या दिग्दर्शनालाच जातं. मजिदींची चित्रपटांकडे बघण्याची दृष्टीच वेगळी आहे. त्यांनी इतक्या लहान मुलांकडून सुंदर काम करून घेतलं आहे. माझी भूमिका खूप अवघड होती, पण ते कलाकाराची मानसिकता समजून घेऊन काम करतात. जर दु:खाचा प्रसंग साकारायचा असेल, रागाचा असेल तर ते कसं करायचं? मग एकच प्रसंग ते माझ्याकडून वेगळ्या पद्धतीने करून घेतील, तर इशानला दुसऱ्याच पद्धतीने समजावून सांगतील. कलाकारांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे त्यांच्याकडून काम काढून घेण्याची त्यांची पद्धत बदलते. त्यांच्या त्या पद्धतीचा फायदा झाला,’’ असं ती सांगते. शिवाय, तिने मल्याळम इंडस्ट्रीत केलेल्या कामाचाही या चित्रपटासाठी फायदा झाल्याचं सांगितलं. मल्याळम इंडस्ट्री खूप शिस्तीची आहे. तिथे तुम्हाला वेळेत यावं लागतं, संवाद पाठ करूनच सेटवर यायचं असतं. रिटेक फार होत नाहीत. तुम्हाला पहिल्या टेकमध्येच ओके करायचं असल्याने पूर्ण तयारीनिशी कॅमेऱ्यासमोर यावं लागतं. ही कामाची सवय मला या चित्रपटासाठी खूप उपयोगी पडली, कारण बाकी तयारी करत बसायला मला वेळच नव्हता. मला जे काही करायचं होतं ते सेटवर येऊनच करायचं होतं, असं ती सांगते. मुंबईत शिवडी, धोबीघाट, वर्सोवा अशा ठिकाणी या चित्रपटाचं चित्रीकरण झालं आहे. आपल्याच शहरात चित्रीकरण करण्याचा आनंद काही वेगळाच असतो, असं म्हणणारी मालविका गेली कित्येक वर्ष मी मुंबईत आहे, मात्र धोबीघाटचा परिसर मी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच पाहिला. इथलं एक वेगळंच जग आम्ही अनुभवलं. सामान्यपणे ज्या गोष्टी मी कधीच केल्या नाहीत म्हणजे कपडे इस्त्री करायलाही मी धोबीघाटावर येऊन शिकले. त्यामुळे ही नवी दुनिया समजावून घेणं त्याचबरोबर माझी भूमिका दोन भागांत आहे. सुरुवातीला साधी व्यक्तिरेखा आणि मग तुरुंगात गेल्यावरचा ताराचा प्रवास आहे. त्यासाठी मला आठ किलो वजन कमी करायचं होतं. माझा चेहरा उतरलेला दिसायला हवा होता. या सगळ्यासाठी अगदी पाणीही मला कमी प्यावं लागायचं. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक हा दोन्ही तयारीचा भाग थोडा परीक्षेचा होता, असे तिने सांगितले.

माजिद मजिदी हे संवेदनशील दिग्दर्शक आहेतच, पण माणूस म्हणूनही ते खूप हळवे आहेत. रस्त्यावरून सहज चालता चालताही त्यांना एखादा लहान मुलगा दिसला तर ते अस्वस्थ व्हायचे. मात्र तेच सेटवर आल्यावर शिस्तीत काम सुरू असायचं. प्रत्येकाने आपल्या कामावर लक्ष केंद्रित करायला हवं, ही त्यांची अपेक्षा असते. त्यांच्याकडून खूप काही शिकता आलं, असं मालविकाने सांगितलं. बॉलीवूडची नायिका कधी पहिल्याच चित्रपटातून बहिणीच्या भूमिकेत समोर येणार नाही. मात्र ही मानसिकता आता बॉलीवूडजनांनी बदलायला हवी, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली. आधीच्या हिंदी चित्रपटांमधून आई-मुलगा, भाऊ-बहीण अशा नात्यांवर भाष्य करणारे किती तरी चित्रपट होते. आता मात्र बॉलीवूड प्रेमपटांच्या साच्यात अडकून पडले आहेत. प्रेमपट चांगले असतात, पण तेच तेच किती दिवस पाहणार, असा सवाल ती करते. बॉलीवूडमध्ये सध्या ‘क्वीन’, ‘पिंकू’ असे नायिकाप्रधान चित्रपटही होतायेत. मला अशाच भूमिकांमधून काम करायचे आहे, असं ती स्पष्ट करते. हॉलीवूडमध्येही जेनिफर लॉरेन्स, अ‍ॅन हॅथवेसारख्या अभिनेत्री भूमिकांच्या बाबतीत वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात. बॉलीवूड कलाकारांनीच नव्हे तर दिग्दर्शकांनीही आपला दृष्टिकोन बदलून नवनवे विषय हाताळायला हवेत. तरच कलाकारांना त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांना काही वेगळं देता येईल, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली. सध्या तरी हिंदी चित्रपटांवर तेही चांगल्या, अर्थपूर्ण भूमिकांवर लक्ष केंद्रित करायचा निर्धारही मालविकाने व्यक्त केला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2018 2:59 am

Web Title: majid majidi bollywood movie
Next Stories
1 फिरुनी पुन्हा परतेन मी!
2 सेक्सी दुर्गा चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे अन्यायाविरोधात पंतप्रधानांना पत्र
3 चर्चेतील ‘शिकारी’ २० एप्रिलला दिसणार..
Just Now!
X