सुधारित नागरिकत्व कायदा आणि नागरिक नोंदणी या दोन मुद्दय़ांवर देशभर आंदोलन तीव्र झाले. या पार्श्वभूमीवर ‘राजकारणाचं भजं झालंय’, अशी प्रतिक्रिया अभिनेता मकरंद अनासपुरेनं दिली आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या अंतिम फेरीला मकरंद उपस्थित होता. यावेळी दिलेल्या मुलाखतीत मकरंदने सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं.

“जेव्हा शासनव्यवस्था कुठलाही निर्णय घेते, तेव्हा त्यावर पूर्ण अभ्यास करून प्रतिक्रिया द्यायला पाहिजे. अनेकांच्या प्रतिक्रियांवरून कळतच नाही की हे नेमकं काय आहे. बऱ्याचदा शासनव्यवस्थेविरुद्ध व्यवस्थापन कार्यरत असते, त्यांना त्यांचं काहीतरी साधून घ्यायचं असतं. माझं वैयक्तिक मत असं आहे की, राजकारणाचं भजं झालंय. एखाद्यावर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती सध्याची नाही. खंत वाटावी अशी ही परिस्थिती आहे. पूर्वीचे नेते ज्या ताकदीने, ज्या निष्ठेने उभे राहिले होते त्याचं शेवटपर्यंत त्यांनी पालन केलं होतं. अलीकडच्या काळात असं खूप कमी दिसू लागलंय”, अशी खंत मकरंदने व्यक्त केली.

आणखी वाचा : ‘पॉवर’ की ‘पवार’ पॉलिटिक्स..’धुरळा’च्या टीमला पुण्यात काय जाणवलं ?

सुधारित नागरिकत्व कायद्यावर सध्या जो गोंधळ सुरू आहे तो मनाला यातना देणारा आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेते अविनाश नारकर यांनी दिली.