08 March 2021

News Flash

मराठीतही ‘सर सर सरला’

मकरंद देशपांडेंचे ‘सर सर सरला’ छोटय़ा पडद्यावर

|| मानसी जोशी, लोकसत्ता

‘सर सर सरला’ या नाटकाचे मकरंद यांनी मराठीत ‘सर प्रेमाचे काय करायचे’ या नावाने प्रयोग केले होते. या वेळेस घडलेला एक किस्सा त्याने सांगितला. या नाटकाचे ठाण्याला गडकरी रंगायतनला प्रयोग होते. नाटकाचा प्रयोग झाल्यावर एवढा वेळ का लावला?, असा प्रश्न एका प्रेक्षकाने विचारला. हे नाटक वीस वर्षांपूर्वी झाल्यास, माझे आयुष्य काही वेगळे झाले असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. अशा वेळेस आपण करत असलेल्या मेहनतीचे चीज होत असल्याचेही ते सांगतात.

‘सडक २’ हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा आवडला नसला तरीही अभिनेता मकरंद देशपांडेंनी साकारलेली खलनायकाची भूमिका चांगलीच गाजली. बॉलिवूडच्या तद्दन व्यावहारिक चौकटीत न अडकणारे अभिनेता-दिग्दर्शक मकरंद देशपांडे रंगभूमीशी तितकेच एकरुप आहेत. वीस वर्षांपूर्वी त्यांनीच लिहिलेले ‘सर सर सरला’ हे नाटक प्रेक्षकांना छोटय़ा पडद्यावर पाहण्यास मिळणार आहे. ‘टाटा स्काय थिएटर’अंर्तगत हे नाटक आता दूरचित्रवाणीवर प्रेक्षकांसाठी उपलब्ध झाले आहे. वीस वर्षांनंतर हे नाटक छोटय़ा पडद्यावर पहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असे मत मकरंद देशपांडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.

‘सर सर सरला’ या नाटकात मकरंद यांनी प्राध्यापकाची भूमिका साकारली आहे. नाटकाची कथा थोडक्यात सांगताना त्यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली. साहित्य हा समाजाला जोडणारा दुवा आहे. प्रेम हे काव्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही आणि प्रेमावरच हे नाटक बेतलेले आहे. प्राध्यापक त्यांच्या तीन आवडत्या विद्यार्थ्यांना प्रेमाची व्याख्या समजावून सांगतात. महाविद्यालयीन जीवनात प्राध्यापकांनी दिलेल्या शिकवणीचा त्या तीन विद्यार्थ्यांवर कसा परिणाम होतो, हे यात दाखवण्यात आले आहे. प्राध्यापकांचे तीन लाडके विद्यार्थी, शिक्षण संपल्यावर पुन्हा भेटतात. तेव्हा त्यांच्यात जी काही चर्चा होतात. त्यातून ‘सर सर सरला’ हे नाटक आकारास येते.

‘लोकसत्ता’मध्ये ‘लोकरंग’ पुरवणीतील ‘नाटकवाला’ या सदरात त्यांनी ‘सर सर सरला’ या नाटकाची कथा मांडली होती. मकरंद यांनी खास अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसाठी सरला हे नाटक लिहिले. या नाटकात दिग्दर्शक अनुराग कश्यपनेही फणिधरची भूमिका केली होती. मी आणि अनुराग १९९३ पासून एकमेकांना ओळखत होतो. तेव्हा अनुरागचा ‘पाँच’ हा चित्रपट सेन्सॉरमध्ये अडकल्याने तो अतिशय रागात होता. फणिधरच्या भूमिकेद्वारे तुझ्यातील रागाला मोकळी वाट करून दे, असे मी सांगितले. माझ्या शब्दाचा मान ठेवून अनुरागने तालीम केली आणि फणिधरच्या भूमिकेत जीव ओतला. एकदा प्रसिध्द साहित्यिक विजय तेंडुलकर नाटकाचा प्रयोग पाहायला आले असता, त्यांनी अनुरागच्या भूमिकेची प्रशंसा केली होती. या वीस वर्षांत अशी अभिजात कलाकृती पाहिली नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिल्याची आठवण मकरंद यांनी सांगितली.

आज वीस वर्षांनंतर हेच नाटक छोटय़ा पडद्यावर येत आहे. यात मकरंद, आहना कुमरा, संजय दधीच, आणि अंजुम शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हे नाटक करताना नुसते चार कॅमेरे लावून त्याचे चित्रण करायचे नव्हते. तर प्रेक्षक हे नाटक छोटय़ा पडद्यावर पाहताना त्यांना नाटय़गृहाचाच भास होईल याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली आहे. यासाठी प्रकाशयोजना, नेपथ्य, संगीत आणि छायाचित्रण यावर विशेष लक्ष देण्यात आल्याचे ते सांगतात. यंदा अनेक नाटके ओटीटी तसेच डिजीटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. यामुळे नाटकासारख्या अभिजात कलाकृतीचे जतन आणि संवर्धन होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. माध्यमासाठी नाटके चित्रीत करताना प्रकाशयोजना, कॅमेरा अँगल, संगीत याची काळजी घेणे आवश्यक आहे. याकडे लक्ष न दिल्यास रंगभूमीवरील लोकप्रिय नाटक ऑनलाईन पाहताना मजा येत नसल्याचे ते स्पष्ट करतात.

करोनामुळे नाटकाचे प्रयोग बंद होते तेव्हा ऋषीकेश जोशी यांनी ‘नेटक’ तसेच पुण्यातील आसक्त संस्थेतर्फे ‘कलर ऑफ होप’ यासारखे प्रयोग नाटकवेडय़ा मंडळींनी के ले आहेत. यामुळे प्रेक्षकांना टाळेबंदीच्या काळात घरबसल्या नाटक पाहता आले. काळ आणि वेळेप्रमाणे कलाकारांनी वेगळे प्रयोग करायला पाहिजे. आणि इतर कोणी करत असल्यास त्याला पाठिंबा द्यावा असे मकरंद यांचे स्पष्ट मत आहे. आजच्या ओटीटीच्या जमान्यातही ही नाटकवेडी मंडळी नाटक विविध प्रकारे तगवून ठेवत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना नक्कीच आपण दाद दिली पाहिजे असेही त्यांने सांगितले. करोनामुळे सात महिने नाटय़गृह बंद असल्याने रंगमंच कलाकारांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. मकरंद देशपांडे ‘अंश’ नावाचा थिएटर ग्रुप चालवतात. याद्वारे प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर नाटकांची निर्मिती केली जाते.

माझ्याकडेही नाटकासाठी काम करणारी पूर्ण टीम आहे. मी जमेल तसे त्यांना अर्थसाहाय्य करतो असे ते सांगतात. सतत काहीतरी वेगळे प्रयोग करण्याच्या शोधात असलेल्या मकरंद यांचे पुढील वर्षांचे वेळापत्रकही कामाने भरलेले आहे. ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस.के राजामौली यांच्या चित्रपटात तसेच ‘दगडी चाळ २’ या चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीस येतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2020 2:42 am

Web Title: makarand deshpande sir sir sarla mppg 94
Next Stories
1 सिद्धार्थ चांदेकरचे मालिकेद्वारे पुनरागमन
2 ‘बॉलीवूड वाईव्हज’वरून रंगलेला वाद
3 दूरची चित्रवाणी
Just Now!
X