बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला. वयाच्या ३४व्या वर्षी सुशांतने जगाचा निरोप घेतल्याने सर्वजण दु:खी झाले आहेत. पण सुशांतने इतकं टोकाचं पाऊल का उचललं हे अद्याप समोर आलं नाही. सध्या सोशल मीडियावर त्याचे जुने व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होताना दिसतायेत. अशातच सुशांतच एक पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ पाहून भोजपूरी गायिका मालिनी अवस्थीने राग व्यक्त केला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ आयफा पुरस्कार सोहळ्यातील आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता शाहरुख खान आणि शाहिद कपूर सूत्रसंचालन करत असतात. ते सुशांतला स्टेजवर बोलवतात आणि त्याची खिल्ली उडवतात. त्या दोघांचे बोलणे ऐकून सुशांत फक्त हसत असतो. तसेच तेथे बसलेले सर्वचजण त्या तिघांमधील संवाद पाहून हसताना दिसतात.

मालिनी अवस्थी यांनी सुशांतचा हा व्हिडीओ शेअर करत, ‘हा व्हिडीओ पाहून मला धक्काच बसला. मनोरंजनाच्या नावाखाली हे काय सुरु होते’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हणत शाहरुख आणि शाहिदला ट्विटमध्ये टॅग केले आहे.

बऱ्याचवेळा पुरस्कार सोहळ्यामध्ये अशा प्रकारचे सीन क्रिएट करण्यात येतात. हे पहिल्यांदाच झालेले नाही तर असे अनेक वेळा कलाकारांसोबत करण्यात येते. पण आता सुशांतच्या आत्महत्येनंतर हा व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.