बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’. अभिनेता शाहरुख खान आणि काजोल यांच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरलेल्या या चित्रपटाचं आजही प्रेक्षकांच्या मनावर गारुड आहे. ‘बडे बडे देशो मे ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है सेनोरिटा’, असे म्हणत प्रेक्षकांच्या भेटीला येणारा शाहरुख खान अनेकांच्या मनात घर करुन गेला. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विविध विक्रम प्रस्थापित केले. त्यातीलच एक विक्रम म्हणजे मराठा मंदिरमध्ये झालेल्या ‘डीडीएलजे’च्या विक्रमी स्क्रीनिंगचा. या चित्रपटाच्या निर्मिती संस्थेतर्फे मुंबईतील मराठा मंदिर चित्रपटगृहात १ हजार शो चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हापासून शाहरुख आणि काजोलच्या प्रेमाचा प्रवास अनेकांची मनं जिंकून गेला. या प्रवासामध्ये ‘डीडीएलजे’तील प्रत्येक कलाकारासोबतच आणखी एका नावाला तितकच महत्त्वं दिलं पाहिजे. ते नाव म्हणजे, जगजीवन मारु.

या चित्रपटाच्या पहिल्या शोपासूनच मारु यांचे मराठा मंदिरशी जिव्हाळ्याचे नाते तयार झाले. ‘डीडीएलजे’ चित्रपटासाठी प्रोजेक्टर रुममध्ये ऑपरेटर म्हणून काम पाहणाऱ्या मारु यांचं या चित्रपटाशी एक वेगळं नातं तयार झालं आहे. जवळपास ४५ वर्षे त्यांनी प्रोजेक्टर रुमममध्ये ऑपरेटर म्हणून काम केलं आहे.

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चित्रपटाच्या असंख्य चाहत्यांमध्येच मारु स्वत:चीसुद्धा गणना करतात. ‘हा एक परिपूर्ण चित्रपट आहे. संपूर्ण कुटुंबासोबत तुम्ही तो पाहू शकता. एखाद्या वडिलांना त्यांच्या मुलीचा सुखी संसार व्हावा, ती सासरी नांदावी असे वाटते, अगदी तसेच मला ‘डीडीएलजे’बद्दल वाटते. हा चित्रपट इथेच रहावा अगदी कायमचा…हीच माझी भावना आहे’, असे ते एकदा म्हणाले होते.

फार लहान असतानाच मारु गुजरातमधील जुनागढ येथून मुंबईत आले. मराठा मंदिरमध्ये ‘डीडीएलजे’च्या स्क्रीनिंगच्या वेळी सुरुवातीच्या काळात पाच ते सहा रिळं असायची जी प्रोजेक्टरमध्ये टाकावी लागायची असे त्यांनी ‘इंडिया टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. मराठा मंदिरमध्ये झालेले सर्व लहानमोठे बदल, चित्रपटांच्या विशेषत: ‘डीडीएलजे’च्या तिकिट दरांमध्ये झालेले बदल आणि काही अविस्मरणीय प्रसंग या सर्व गोष्टी मारु यांच्या स्मरणात आहेत.

अशा या अवलियाच्या आयुष्यावर ‘बडे टीव्ही वाला’ नावाचा एक लघुपटही साकारण्यात आला आहे. त्यामुळे किंग खानच्या कारकिर्दीतील बऱ्याच लहानमोठ्या मंडळींमध्ये जगजीवन मारु हे नावही महत्त्वाचं आहे असं म्हणायला हरकत नाही. वाढच्या वयातही चित्रपटगृहाच्या प्रोजेक्टर रुममध्ये आपल्या कामात ते फारच आनंदी असून, हे काम येणाऱ्या पिढीला फारसं आकर्षित करत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.