‘रॉकी’, ‘वास्तव’, ‘लगे रहो मुन्नाभाई’ अशा लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे संजय दत्त. उत्तम अभिनय शैली असतानादेखील संजय त्याच्या करिअरपेक्षा पर्सनल लाइफमुळे जास्त चर्चेत राहिला. विशेष म्हणजे वयाची ५० पार केलेला हा अभिनेता आजही अनेकांच्या गळ्यातलं ताईत असून त्याच्याविषयी, त्याच्या पर्सनल लाइफबद्दल जाणून घेण्यास सारेच उत्सुक असतात. त्यामुळेच आज संजयच्या पत्नीच्या मान्यताच्या वाढदिवसानिमित्त या दोघांची लव्हस्टोरी नेमकी कशी सुरु झाली हे जाणून घेऊ.

संजय दत्त आणि मान्यता दत्त या दोघांच्या वयामध्ये जवळपास १९ वर्षांचं अंतर आहे. संजय ६० वर्षांचा आहे. तर मान्यता ४१ वर्षांची. खरंतर या दोघांच्या वयातही प्रचंड अंतर आहे. मात्र तरीदेखील हे दोघं एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असल्याचं अनेक वेळा पाहायला मिळतं. तर या दोघांची प्रेमकथा कोणत्याही चित्रपटाच्या कथेपेक्षा निराळी नाही.

संजय दत्तच्या आयुष्यात अनेक मुली येऊन गेल्या हे साऱ्यांनाच ठावूक आहे. ‘संजू’ चित्रपटात याविषयी उल्लेखदेखील करण्यात आला आहे. परंतु, मान्यता ही संजयच्या आयुष्यात केवळ आलीच नाही, तर तिने आजन्म त्याला साथ देण्याचा निर्धार केला. विशेष म्हणजे संजयच्या पडत्या काळातही मान्यता त्याच्यासोबत ठामपणे उभी होती. तुरुंगात असताना ती त्याला भेटायलाही जायची.

मान्यताचा जन्म २२ जुलै १९७८ मध्ये मुंबईत झाला. परंतु, तिचं बालपण दुबईमध्ये गेलं. दिलनवाज शेख असं खरं नाव असलेल्या मान्यताने कलाविश्वात पदार्पण करण्यापूर्वी तिचं नाव बदललं होतं. सारा खान या नावाने तिने कलाविश्वात पदार्पण केलं. केआरकेच्या देशद्रोही या चित्रपटात काम करत असताना तिला मान्यता हे नवीन नाव मिळालं. त्यानंतर ती याच नावाने ओळखली जाऊ लागली. मान्यताचं पहिलं लग्न मेराज उर रहमान याच्यासोबत झालं होतं. परंतु, काही वैयक्तिक कारणामुळे या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

मान्यताने कलाविश्वातील दिग्गज अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. परंतु, चित्रपटात काम करण्याची योग्य संधी मिळत नसल्यामुळे तिने बी आणि सी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. याच काळात संजय दत्त आणि मान्यताची पहिली भेट झाली. मान्यता काम करत असलेल्या ‘लवर्स लाइक अस’ या चित्रपटाचे हक्क संजय दत्तने खरेदी केले होते. या काळात चित्रपटाच्या निमित्ताने संजय आणि मान्यताच्या भेटीगाठी वाढल्या. त्यानंतर ते दोघं एकमेकांशी फोनवर बोलणं, भेटणं हे सुरु झालं. विशेष म्हणजे या काळात संजय दत्त त्याच्या एका ज्युनिअर आर्टिस्टला डेट करत असल्याचं म्हटलं जातं. मात्र या काळात संजय दत्त मान्यताच्या प्रेमात पडला आणि त्याने २००८ मध्ये गोव्यात मान्यतासोबत लग्न केलं.

दरम्यान, मान्यताने संजयच्या प्रत्येक कठीण प्रसंगात त्याची साथ दिली आहे. आजही ती तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे अनेक वेळा या दोघांची चर्चा चाहत्यांमध्ये आणि कलाविश्वात रंगत असते. या दोघांना दोन लहान मुलेदेखील आहेत.