21 January 2019

News Flash

‘सरगम’ मधून मंदार चोळकर वेगळ्या भूमिकेत

आतापर्यंत मंदारने केवळ गीतलेखन केले आहे

मंदार चोळकर

मराठी सिनेसृष्टीतील कविमनाचा माणूस अशी ओळख असणारा मंदार चोळकर आता एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आतापर्यंत मंदारने अनेक सिनेमे तसेच मालिकांसाठी शीर्षक गीत लिहिले आहे. पण आता मंदारला आपल्यातील गुणवत्ता अजून तपासून पाहायची आहे, असे वाटते. सध्या तो झी युवावर सादर होणाऱ्या ‘सरगम’ या संगीत विषयक कार्यक्रमांच्या भागांचे लेखन करत आहे. त्यामुळे आता तो गीतकारासोबतच लेखकदेखील बनला आहे.

आपल्या लेखनाविषयी सांगताना मंदार म्हणाला की, मी आतापर्यंत केवळ गीतलेखन केले आहे, त्यामुळे जेव्हा मला या कार्यक्रमासाठी निर्मात्यांकडून विचारण्यात आले, तेव्हा सुरुवातीला हे काम मला खूप कठीण वाटले होते. पण, या कार्यक्रमाचे काही भाग लिहिल्यानंतर मला आता ते खूप सोपं वाटू लागलं आहे. कार्यक्रमात येणाऱ्या दिग्गजांविषयीची माहिती या कार्यक्रमाद्वारे दिली जाते. अशा वेळी त्यांच्याबद्दलची माहिती तसेच त्यांचे किस्से माहित असलेला व्यक्ती या कार्यक्रमाशी जोडलेला असणे गरजेचे होते. मी यातील अनेकांसोबत काम केले असल्यामुळे मला ते अगदी सहज गेलं, हे काम करायला खूप मजा येत असून, खूप काही शिकायला देखील मिळत आहे, असे मंदार सांगतो.

असे कार्यक्रम हे वेळ खाऊ असतात असे मंदारला वाटायचे, त्यामुळे यापासून तो काहीकाळ दूरच राहिला होता, पण आता तो हे सगळे चांगलेच एन्जॉय करत असून, याबरोबरच त्याचे गाणी लिहिणेदेखील सुरूच आहे. विशेष म्हणजे नवनिर्वाचित लेखक बनलेल्या मंदारनेच ‘सरगम’चे शीर्षकगीत लिहिले आहे.

First Published on March 21, 2017 9:29 pm

Web Title: mandar cholkar zee yuva program sargam