जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत करोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून एकट्या मुंबईत सुमारे १५ हजार करोनाबाधितांची कालपर्यंत नोंद झाली आहे. देशात येत्या १७ मे रोजी तिसरा लॉकडाउन संपून चौथ्या लॉकडाउनला सुरुवात होणार आहे. अशात अभिनेता मनिष पॉलने एक ट्विट केले आहे. त्याचे हे ट्विट सध्या चर्चेत आहे.

नुकताच मनिष पॉलने ट्विटरद्वारे एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्याला ‘जर तुला पंतप्रधान होण्याची संधी दिली तर तु काय केलं असतं? करोनाशी कसा सामना केला असता’ असा प्रश्न विचारला होता. त्यावर मनिषने ट्विट करत अनेकांची मने जिंकली आहेत.

‘मला नाही वाटत सध्याच्या घडीला ही जबाबदारी कोणी सांभाळू शकेल. आपण योग्य व्यक्तीला मतदान केले आहे. आपण फक्त पंतप्रधान नरेंद्र यांची भूमिका साकारण्याची कल्पना करु शकतो. ते ज्या प्रकारे १३० कोटी लोकांना सांभाळत आहेत त्या प्रकारे कोणीही सांभाळू शकत नाही’ असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान मनिष पॉलने लॉकडाउनचा संपूर्ण वेळ आनंदात आपल्या कुटुंबीयांसोबत घालवत असल्याचे देखील म्हटले आहे. तसेच त्याने जनतेला गरज असल्यास घराबाहेर पडण्याचे आवाहन देखील केले आहे.