‘बॉलिवूडची क्वीन’ कंगना रणौत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद काही नवा नाही. गतवर्ष या दोघांच्या भांडणानं चांगलंच गाजलं होतं. या दोघांची लढाई आता पुढील वर्षी बॉक्स ऑफिसवरदेखील पाहायला मिळणार आहे. कारण कंगनाचा ‘मणिकर्णिका’ आणि हृतिकचा ‘सुपर ३०’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे.

झी स्टुडिओ आणि कमल जैन यांची निर्मिती असलेला ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट २५ जानेवारी २०१९ मध्ये प्रदर्शित होत आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून कंगना या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील ब्राह्मण समुहाने ऐतिहासिक तथ्यांसोबत छेडछाड केल्याचा आरोप या चित्रपटावर केला होता, त्यामुळे हा चित्रपट वादात सापडला होता. अखेर हा चित्रपट पुढील वर्षांत प्रदर्शित होत आहे. तर याच दिवशी हृतिकचा ‘सुपर ३०’ हा चित्रपटदेखील प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. आनंद यांनी जेईईसाठी अनेक गरिब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं आहे. त्यांच्यामुळे अनेक गरिब विद्यार्थ्यांचं शिक्षण मार्गी लागलं तेव्हा हा चित्रपटदेखील हृतिकसाठी तितकाच महत्त्वाचा आहे.

२०१७ मध्ये हृतिकनं ‘काबील’ या चित्रपटात काम केलं होतं. त्यानंतर साधरण वर्षभराचा ब्रेक घेऊन तो रुपेरी पडद्यावर परतणार आहे. हे दोन्ही चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित होणं अपेक्षित होतं मात्र काही कारणामुळे दोन्ही चित्रपटाच्या प्रदर्शनांची तारीख पुढे ढकलली. तेव्हा बॉक्स ऑफिसवर कंगना आणि हृतिक या दोघांपैकी कोणाच्या चित्रपटासाठी प्रेक्षक गर्दी करणार हे पाहण्यासारखं ठरेल.